रॅपिड अँटीजन तपासणीला मान्यता ;अर्ध्या तासात निदान शक्य !
करोनासाठी केवळ १५ ते ३० मिनिटांत याद्वारे निदान होईल. यासाठी सरकारने आता रॅपिड अँटीजन तपासण्यांचा उपयोग करण्यासाठी मान्यता दिली आहे.
मुंबई (प्रतिनिधी)।
करोनासाठी करण्यात येणाऱ्या स्वॅब तपासण्यांचे जलदरित्या निदान व्हावे यासाठी सरकारने आता रॅपिड अँटीजन तपासण्यांचा उपयोग करण्यासाठी मान्यता दिली आहे. केवळ १५ ते ३० मिनिटांत याद्वारे निदान होईल.
तापसदृश्य लक्षणे असलेल्या, तसेच अतिजोखमीच्या व्यक्तींच्या संपर्कातील लक्षणे नसलेल्या, हृदयविकार, मूत्रपिंड विकार, मधुमेह तसेच उच्चरक्तदाबाच्या रुग्णांसह गरोदर मातांसाठी या तातडीच्या चाचणीचा उपयोग होईल. या तपासणीचा वापर प्रतिबंधित क्षेत्रे, तसेच हॉटस्पॉटमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करता येणे शक्य आहे. प्रतिबंधित क्षेत्रे, हॉटस्पॉट तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये तातडीच्या उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी त्याचा प्रामुख्याने फायदा होईल.
एसडी बायोसेन्सर कंपनीच्या स्टॅन्डर्ड क्यू कोव्हीड १९ एजी डिटेक्शन किटद्वारे ही तपासणी करण्यात येईल. या किटमधील एका चाचणीचा दर ४५० रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. राज्य सरकारचा सार्वजनिक आरोग्यविभाग तसेच वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या रुग्णालयांसाठी या कंपनीचे एक लाख किट मागवण्यात येणार आहेत. किटखरेदीचे अधिकार सार्वजनिक रुग्णालये, खासगी वैद्यकीय महाविद्यालये तसेच खासगी आरोग्यसंस्थांनाही देण्यात आले आहेत.
करोनासाठी सध्या आर.टी.पी.सी.आर ही निदान चाचणी उपलब्ध आहे. या चाचणीसाठी आर.टी.पी.सी.आर मशीन तसेच सी.बी.नॅट तंत्रज्ञानाद्वारे चाचण्या केल्या जातात. सी.बी. नॅटद्वारे तपासणीसाठी एकावेळी केवळ एक ते चार मर्यादेत होणाऱ्या तपासण्या करता येतात. तसेच कार्टीजची उपलब्धताही पुरेशी नसते. त्याची किंमतही अधिक आहे. त्यामुळे करोनाच्या चाचण्यांचे निदान होण्यास वेळ लागतो. चाचण्यांचे निदान तातडीने कसे होईल, यासाठी संशोधन सुरू आहे. सध्या आरटी- पीसीआर पद्धतीने करोनाच्या चाचण्या केल्या जात असून, त्यांसाठी विशेष प्रयोगशाळेची आवश्यकता असते. मात्र रॅपिड अँटीजन निदान पद्धतीत किटमध्ये उपलब्ध वैद्यकीय उपकरणांच्या सहाय्याने तपासणी करण्यात येते. त्यामुळे त्यांचे निदान जलदरितीने होते.
आयसीएमआरने दिलेल्या निर्देशानुसार एक डिटेक्शन किटच्या माध्यमातून सार्स- करोना-२ या एन्टीजनचे निदान होते. रुग्णाच्या शरिरातील विषाणूंच्या प्रमाणानुसार चाचण्यांचे निदान पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण ५०.६ ते ८४ टक्के आहे. त्यामुळे अत्यंत तातडीच्या वेळी हे किट उपयुक्त ठरेल.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा