लाच घेतल्या प्रकरणी तलाठ्यास १० वर्षांची शिक्षा; न्यायालयाचा निकाल !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (प्रतिनिधी) :- 13 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास 10 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. नायर यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन त्याचा निकाल लागला.
या खटल्याची लाचलुचपत विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदाराच्या आई-वडिलांनी ब्राह्मणवाडे शिवारात (ता. सिन्नर) 10 गुंठे शेती विकत घेतली होती. याची नोंद महसुली रेकॉर्डवर घेण्यासाठी नायगाव सजाचे तलाठी मनोज किसन नवाळे यांनी 13 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या तक्रारीवरून दि. 14 ऑगस्ट 2013 रोजी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. यावेळी नवाळे यास लाच घेतांना रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून नाशिक न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. नायर यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन त्याचा निकाल लागला. त्यात तलाठी मनोज नवाळे यास भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 प्रमाणे 5 वर्ष सक्त मजुरी व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिन्यांचा कारावास तसेच कलम 13 (2) प्रमाणे 5 वर्ष सक्त मजुरी व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिन्यांचा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात सरकार तर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता कडवे यांनी काम पाहिले.