लॉकडाऊनमुळे देशातील २४ कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम
चीनच्या वूहान शहरातुन पसरेल्या कोरोनावर अद्याप औषध आलेलं नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगातील अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केलं होतं. भारतातही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देश लॉकडाऊन लागू केला. या लॉकडाऊनचा फटका विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशातील २४ कोटी ७० लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. युनिसेफने हा अहवाल तयार केला असून या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम दक्षिण आशिया क्षेत्रातील तब्बल ६० कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मुलांमधील शिक्षण आणि शिक्षणाच्या दृष्टीकोनाकडे लक्ष वेधत संयुक्त राष्ट्राच्या अहवालात असं म्हटलं आहे की, “प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या २४ कोटी ७० लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर शाळा बंद असल्यामुळे परिणाम झाला आहे. याव्यतिरिक्त अंगणवाडी केंद्रातील बालवाडीत शिकत असलेल्या २ कोटी ८० लाख विद्यार्थ्यांवरदेखील याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, या अहवालात केंद्र आणि राज्य सरकारांनी वेब पोर्टल्स, मोबाईल अॅप्स, टिव्ही चॅनेल्स, रेडिओ आणि पॉडकास्ट यासारख्या अनेक ई-प्लॅटफॉर्मवरुन मुलांपर्यंत शिक्षण मिळवून देण्यासाठी मुलांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांकडेही लक्ष दिलं आहे.