लोकायुक्तांच्या नावाने खोटे नियुक्तीपत्र, फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (प्रतिनिधी): लोकायुक्तांच्या नावाने आरोग्य पर्यवेक्षक व ज्युनिअर क्लार्क पदी नेमणुकीचे खोटे नियुक्तीपत्र व ओळखपत्र तयार करून देणाऱ्या भामट्यांविरुद्ध जिल्हा परिषदेच्या आरोग्य प्रशासन अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्याने त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेलरोड परिसरातील हितेंद्र नायक यांना आरोग्य पर्यवेक्षक व पत्नीला जुनिअर क्लार्क पदासाठी लोकायुक्तांच्या नावे नियुक्तीपत्र देण्यात आले होते. यांना हे पत्र मिळाल्यावर ते नोकरीवर रुजू होण्यासाठी जिल्हा परिषदेत गेले व लोकायुक्तांच्या नावाचे पत्र त्याठिकाणी दाखवले. परंतु २०१६ पासून जिल्हा परिषदेत सरळ सेवेसाठी कोणतीही भरती घेण्यात आलेली नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. हितेंद्र नायक यांना मिळालेलं पत्र हे खोट आहे असे प्रशासन अधिकारी प्रकाश थेटे यांना समजले त्यांनी यावर अजून चौकशी केल्यावर त्यांना हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. या प्रकरणाच्या चौकशीअंती वरिष्ठ अधिकाऱ्यांची संगणकीय सही स्कॅन केलेली व त्यांच्या बनावट सहीच्या आधारे खोटे नियुक्तीपत्र तयार केल्याचे आढळून आले. हे सगळे उमेश उदावंत नावाच्या व्यक्तीने केले होते हेही समोर आले. या व्यक्ती विरोधात प्रकाश थेटे यांनी भद्रकाली पोलिसठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे.