वृत्तपत्रक्षेत्रातील चालते फिरते विद्यापीठ…मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे !
सावदा (प्रतिनिधी)। दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे यांचे आज, दिनांक ६ ऑगस्ट २०२० ला दुपारी एक वाजता त्यांचे जन्मगाव असलेल्या गायमुख वाडी तालुका जुन्नर येथे निधन झाले. बाबांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालूक्यातील उंब्रज या गावी ७ मार्च १९३८ ला झाला होता.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा या छोट्याशा गावातून जगण्यासाठी तोंडी लावण्यापुरती इयत्ता चौथी पर्यंत वाचन आणि लिखाण करण्यासाठी शाळा शिकलेला एक मुलगा मुंबईला जातो. सुरुवातीला पडेल ती कामे करुन उदरनिर्वाह करतो. त्यानंतर बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र टाकण्याचे काम सुरू केले.त्यातूनच वृत्तपत्र वितरणाची कामे करतो. हळूहळू स्वत:ची वृत्तपत्र एजन्सी सुरु करतो आणि अल्पावधीतच आपले नाव मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी या वृत्तपत्रांच्या वितरणात मोठे करतो. ते नाव म्हणजे मुरलीधर अनंता शिंगोटे. गिरगावात त्या काळात जुन्नरच्याच दांगट नावाच्या व्यक्तीची वितरण एजन्सी होती. या दोन जुन्नरकरांनी त्या काळात आख्ख्या मुंबईची वितरण व्यवस्था ताब्यात घेतली होती. दक्षिण भारतातील इनाडू, गुजरातमधील गुजरात समाचार, संदेश यांसह डझनभर वृत्तपत्रांची वितरणाची एजन्सी ताब्यात असलेल्या मुरलीधर शिंगोटेंनी 80-90 च्या दशकात महाराष्ट्रातील वितरण क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला होता. वृत्तपत्र क्षेत्रातील अनुभवाची शिदोरी ताब्यात असलेल्या शिंगोटेंना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल अशा भाषेतले वृत्तपत्र आपलेही एखादे दैनिक असावे याबाबतचा विचार मनात रुंजी घालू लागला. त्यानुसार त्यांनी 1999-2000 च्या दरम्यान मुंबई चौफेर हे सायंदैनिक सुरु केले. त्यानंतर आपला वार्ताहर, पुण्यनगरी, कर्नाटक मल्ला, दैनिक यशोभुमी, ही दैनिके कोणतेही भांडवल पाठिशी नसताना फक्त वाचकांच्या जोरावर बाबांनी सुरु केली. यातील पुण्यनगरी दैनिक महाराष्ट्रातील वृत्तपत्र क्षेत्रातील मैलाचे दगड ठरलेले आहे. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ याठिकाणी दैनिक पुण्यनगरीच्या जिल्हावार आवृत्त्या आहेत. खपाच्या दृष्टिकोनातून पुण्यनगरीने आपला स्वतंत्र असा वाचकवर्ग तयार केला आहे. विशेष म्हणजे मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर बाबा शिंगोटे हे एकमेव होते. 2002-03 ला सुरु झालेल्या या दैनिकाने अल्पावधीतच यश संपादन केले, हे केवळ मुरलीधर शिंगोटे यांच्या अनुभवामुळेच. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा नियम बाबांनी तंतोतंत पाळला. एवढ्या मोठ्या वृत्तपत्राचे मालक असुनसुद्धा शिंगोटे यांनी खोट्या व बेगडी प्रसिद्धीला कधीच थारा दिला नाही. भूक लागली तर प्रसंगी वडापावच्या गाडीवर थांबून वडापाव खाणारा हा माणूस. कुठल्याही भांडवलदारी शेठजी-भटजींची हुजूरेगिरी न करता बाबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा मराठी वृत्तपत्रसृष्टिमध्ये उमटवलेला आहे. त्यांच्या निधनाने वृत्तपत्रसृष्टीने एक अनुभवसंपन्न व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. *