शासकीय मका खरेदी केंद्राला मुदत वाढिसाठी प्रस्ताव केंद्राला पाठवावा– खा.रक्षा खडसे
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। केंद्र सरकार द्वारे महाराष्ट्र राज्यात शासनाच्या आधारभूत किमतीवर आधारित शासकीय मका खरेदी केंद्र सुरु होती. परंतु केंद्र सरकारचे अडीच लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने शासनातर्फे महाराष्ट्रातील सर्व शासकीय मका खरेदी केंद्र बंद करण्याचे दि.१८/१२/२०२० रोजी आदेश काढण्यात आले.
परंतु महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांनी मका खरेदी बाबत शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेली असुन, त्यांच्या मक्याची शासनाकडून खरेदी झालेली नाही. याबाबत ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरण
केंद्रीय राज्यमंत्री मा.रावसाहेब पाटील दानवे यांच्याशी खासदार रक्षाताई खडसे यांनी पत्रव्यवहार केला आणि मा. मंत्रीमहोदय यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेनुसार राज्य सरकारने शासकीय मका खरेदी मुदत वाढ मिळणे बाबत केंद्राकडे प्रस्ताव सादर केलेला नाही असे कळाले. म्हणून ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा मका खरेदी होण्याबाबत शासकीय मका खरेदी केंद्राला मुदत वाढ मिळणेसाठी महाराष्ट्र राज्य सरकार कडून तत्काळ केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविणे बाबत संबंधितांना आदेश देण्यात यावे अशी विनंती खासदार रक्षा खडसे यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री .ना.छगन भुजबळ जी यांना केलेली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.