शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा निर्णय ! इयत्ता १ ली ते १२ वीचा अभ्यासक्रम २५ % कमी होणार, सरकारची मंजुरी !
मुंबई (वृत्तसंस्था)। ‘कोविड 19’ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इयत्ता 1 ली ते 12 वीसाठी सुमारे 25 टक्के पाठ्यक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास राज्य सरकारकडूनही मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कोरोना काळात सगळ्यांना चिंता आहे ती विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षणाची. पालक संघटना आणि तज्ज्ञांनी नियमावली जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळा आणि महाविद्यालयांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. सोशल डिस्टन्सिंग हा कोरोनावर उपाय असल्याने शाळेत पूर्वीसारखं आता जाता येणार नाही. ही परिस्थिती किती दिवस असेल याचाही अंदाज अजुन कुणालाच नाही त्यामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाइन क्लासेसे सुरू केले आहेत. त्यामुळे ऑनलाइन क्लासेसे च्या नावावर काही शाळांनी सुरू केलेल्या मनमानीला चाप लागणार आहे.
- -Pre Primary – पालक आणि मुलांसाठी ठरवून दिलेल्या दिवशी फक्त 30 मिनिटे
- -Class 1 to 12 – सगळ्यांसाठी NCERTने अभ्यासक्रम आखून दिला आहे. त्याप्रमाणे अभ्यासक्रम घेतला जावा.
- -Class 1 to 8 – प्रत्येक दिवशी 30- 45 मिनिटांचे दोन सेशन्स. त्यापेक्षा जास्त नको
- -Class 9 to 12 – प्रत्येक दिवशी 30- 45 मिनिटांचे चार सेशन्स.
या व्यतिरिक्त काही गृहपाठ देऊन इतर उपक्रम राबविण्याची शिफारसही केंद्रीय मंत्रालयाने केली आहे. सतत स्क्रिन समोर राहिल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर सतत घरी बसून राहिल्यामुळे त्यांच्या खेळण्यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे व्यायाम होत नाही. त्याचा परिणाम मुलांच्या जडण घडणीवर होऊ शकतो. या सगळ्यांचा विचार करून शाळा-पालक आणि विद्यार्थी यांनी मिळून या संकटाच्या काळात पुढे गेलं पाहिजे असं मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.