संतापजनक : अभ्यास येत नाही म्हणून सावत्र बापाकडून ५ वर्षांच्या चिमुरडीला चटके..
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा : येथिल सातपूर परिसरात निर्दयतेचा कळस गाठत सावत्र बापाकडून पाच वर्षांच्या मुलीला “अभ्यास येत नाही” या कारणावरून अमानुष मारहाण आणि चटके दिल्याची खळबळजनक घटना घडली असून या प्रकरणी मुलीच्या आईने सातपूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे.
याबाबत अधिक असे, सातपूरच्या जाधव संकुल येथील एका महिलेच्या पहिल्या पतीचे अपघाती निधन झाले होते.त्यांनतर, तिने दुसरा विवाह केला होता. तिला पहिल्या पतीकडून पाच वर्षांची मुलगी आहे. हे सर्व एकत्र राहत होते. उदरनिर्वाहासाठी महिला ही कामासाठी दररोज बाहेर जात होती, याच वेळी तिच्या दुसऱ्या पतीकडून तिच्या पाच वर्षांच्या लहान मुलीला अभ्यास येत नाही म्हणून अनेक वेळी अमानुष मारहाण केली जात होती. त्यातच पुन्हा या सावत्र बापाकडून या कारणावरून पीडित मुलीला मारहाण करून तिला चटके देण्यात आले. ही बाब लक्षात येताच मुलीच्या आईने सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ०१५१/२०२१ नुसार भारतीय दंड विधान ३२३, ३२४, ५०४, ५०६ आणि बाल न्याय अधि. २००० (मुलांची काळजी व संरक्षण) ७५ या प्रमाणे संशयित आरोपिवरती गुन्हा नोंदविण्यात आला आहे.