सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलल्या !
मुंबई : राज्यातील कोरोना या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थाच्या निवडणूका १८ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.सध्याच्या कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता, कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी शासनाने ३१ मे रोजीच्या आदेशान्वये राज्याचा लॅाकडाऊन कालावधी ३० जूनपर्यत वाढविण्यात आला आहे. तसेच अद्यापही साथीचा रोग आटोक्यात येण्यास काही अवधी लागणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदविस वाढ होत आहे.अशावेळी राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका घेणे उचित होणार नाही. म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कक मधील तरतुदीनुसार ज्या प्रकरणी उच्च,सर्वोच्च न्यायालयाने निवडणूका घेण्याचे आदेशीत केले आहे. आशा सहकारी संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्यावर असतील त्या टप्यावर पुन्हा पुढील तीन महिन्यांपर्यत पुढे ढकलण्यात येत आहेत असेही पाटील यांनी संगितले.