साकळीत जोरदार पाऊस बरसला,नदी-नाल्यांना पूर,
पिकांना जिवदान !
हिंगोणा ता.यावल (प्रतिनिधी)। साकळी ता.यावल सह इतर ही भागात आज दि.१५ रोजी पासून सकाळपासून जवळपास तीन ते चार तास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गेल्या जवळपास पंधरवड्यापासून गायब झालेल्या पावसाने आज चांगली दमदार एंट्री केल्याने सर्वत्र आनंद व समाधानाचे वातावरण होते. तर शेतातील पिकांना जिवदान मिळाले असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहे. दरम्यान जोरदार पावसामुळे साकळी गाव परिसरातून वाहणार्या भोनक नदी व नागझिरी नाल्यास पूर आला होता.
यंदाच्या पावसाळ्या दरम्यान जून पासूनच साकळी सह परिसराला जोरदार पावसाची गरज होती. परंतु तो पाहिजे तसा बरसलाच नाही. पुर्ण जून महिना व जुलैच्या सुरुवातीला सुद्धा उन्हाळ्या प्रमाणे उन्हाचा कडक तडाखा जाणवत होता. आकाशात ढग यायचे व निघून जायचे व पावसाची प्रतीक्षा राहायची. व या दरम्यान उन्हामुळे गरमीचे प्रमाणे वाढले होते. पावसा अभावी बागायती व पावसाळी पिकांना मोठा धोका निर्माण झालेला होता. तर काही शेतकऱ्यांच्या शेतामधील लहान अवस्थेतील पिके कोमजत होती. जळत होती. त्यामुळे आपल्या दृष्टीसमोर होणाऱ्या पिकांचे नुकसान पाहून शेतकरी वर्ग चिंतातुर बनला आहे. व पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला होता. दरम्यान आज सकाळ पासूनच आकाशात काळ्या ढगांची गर्दी दाटली होती. यानंतर ढगांचा कडकडाटासह मुसळधार पावसाचे आगमन झाले. रस्त्यांवरुन चांगलेच जोरदारपणे पावसाचे पाणी वाहून निघत होते.
दरम्यान साकळी गावपरिसरातून वाहणाऱ्या भोनक नदीस व मुख्य चौक परिसरातून वाहणार्या नागझिरी नाल्यास पूर आला होता. नागझिरी नाल्यास पूर आल्याने या भागातील काही दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. नागरिकांनी, तरुण वर्ग व लहान मुलांनी पुर पाहण्याचा आनंद घेतला. त्याचप्रमाणे भोनक नदीवरील नावरे गावाजवळील जुन्या धरणाच्या भागात पाणी चांगलेच साठल्याने धरणातून पाणी ओसंडून वाहत होते.तर आजच्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला होता.