सावदा पालिकेच्या सत्ताधारी गटाचे गटनेते यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची विरोधी गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !
सावदा (प्रतिनिधी)। सावदा नगरपालिकेतील सत्ताधारी गटाचे गटनेते अजय भागवत भारंबे यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करीत त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे यासंदर्भातील लेखी तक्रार अपक्ष नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते फिरोज खान पठान, नगरसेवक सिध्दार्थ बडगे अशा चार नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे दाखल केली गेल्याने सत्ताधारी विरुद्ध अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात नगरसेवक पद अपात्रतेची धुमचक्री सुरू झाल्याने शहरात चर्चेचा विषय बनला असून या बाबत अनेक तर्क वितर्क मांडले जात आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार विरोधी गटाकडून जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सावदा पालिकेचे सत्ताधारी गटाचे गटनेते तथा नगरसेवक अजय भारंबे हे सन २०१६ पासून नगरसेवक आहेत. त्यांनी पदाचा गैरवापर केला असून त्यांचे वडील भागवत अवसू भारंबे यांचे नावावर असलेली हिंदू एकत्रित कुटुंबनुसार सावदा न पा कडे भू-अभिन्यास मंजूर केलेला आहे. भू-अभिन्यास मंजूर करताना त्यांनी न पा ला १०० रूपयांचे स्टँमपेपर वर लिहुन दिलेले आहे की, सदरच्या भु-अभिन्यासामध्ये मी गटारी चे बांधकाम करून देईल. व त्या स्टँमपेपर मध्ये माझे वारसदार जबाबदार राहतील. असे लिहून दिलेले आहे. सदरील भु-अभिन्यासावर १० लाखाच्या वर वसुली रक्कम असून संबंधित मालकाने न पा कडे जमा करावी म्हणून न पा मुख्याधिकारी यांनी संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार भु-अभिन्यास मालकाचा मुलगा अजय भागवत भारंबे नगरसेवक आहे. तो सत्ताधारी गटाचा असल्याने आजपावेतो नगरपालिकेची थकबाकी भरण्यास तयार नाही. त्यामुळे या जमिनीवर न पा चे नाव लावण्याचा आदेश मुख्याधिकारी यांनी कर-अधिक्षकांना दिलेला आहे. त्यामुळे यावरून सिद्ध होते की, अजय भारंबे यांनी पदाचा दुरूपयोग केला असल्याचे तक्रारीत म्हटले असून तसेच अजय भारंबे हे नगरसेवक आहेत व वडील भागवत अवसु भारंबे यांनी एकत्रित कुटुंब पध्दतीने एकत्र असलेली सावदा शिवारातील जमीन गट नंबर १३१/ पार्ट हे नोव्हेंबर २०१९ पासून न पा हद्दवाढीत समाविष्ट झालेली आहे. सदरील जमिनीवर भु-अभिन्यास मंजूर करते वेळी ओपन स्पेस मोकळी जागा व रस्ते दाखविण्यात आले आहे. परंतू या ओपन स्पेस जमिनीवर शेतीची पेरणी करून उत्पन्न घेण्यात येत आहे. त्यामुळे पीता पुत्रांनी संगनमत करून ओपन स्पेस व रस्त्याची जागा हडप केल्याचा आरोप केला आहे. नगरसेवक भारंबे यांनी पदाचा गैरवापर करून जागा हडप केल्यामुळे त्यांनी पदाचा दुरूपयोग केलेला असल्याने त्यांना अपात्र करण्याची लेखी तक्रार केली गेली आहे. तसेच याआधी सत्ताधारी गटनेते अजय भारंबे यांनी अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचे पद रद्द करण्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे. यामध्ये दोन्ही नगरसेवक रडार वर आहेत. पदाचा गैरवापर केल्याने दोघांनी एकमेकांचे पद रद्द करण्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे केल्याने शहरात एकच चर्चिले जात आहे. गटनेते भारंबे यांच्या म्हणण्यानुसार ही प्रॉपर्टी माझ्या वडिलांची असून मी नगरसेवक होण्याच्या आधी एन ए करण्यात आली आहे यामुळे मी पदाचा दुरुपयोग केलेला नसल्याचे म्हटले आहे.