हे सारं न भूतो, न भविष्यती आहे – नरेंद्र मोदी
अयोध्या (वृत्तसंस्था)। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये आज राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोदींच्या हस्तेच राम मंदिराच्या शिलान्यासाचं उद्घाटन देखील करण्यात आलं. यावेळी मोदींनी उपस्थितांना संबोधित करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. ‘जगभरातल्या कोट्यवधी रामभक्तांना आजच्या या प्रसंगी कोटी कोटी शुभेच्छा’, असं म्हणत ‘बोलो सियावर रामचंद्र की जय’ अशी घोषणा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसतेय. श्रीरामांना खारीसहीत वानर, केवटच्या वनवासी बंधुंची सोबत मिळाली होती. ज्या पद्धतीनं दलित, मागासवर्गीय, आदिवासी अशा प्रत्येक वर्गानं स्वातंत्र्याच्या लढाईत महात्मा गांधींना साथ दिली होती…. त्याच पदधतीनं सर्वांच्या सहकार्यानं राम मंदिराचं निर्माण होतंय, ‘या कार्यक्रमाला मी येणं स्वाभाविकच होतं. भारत आज शरयू नदीच्या किनारी एक सुवर्णअध्याय रचत आहे. आज संपूर्ण भारत राममय झालाय. आज अनेक शतकांची प्रतिक्षा संपली आहे. कोट्यवधी लोकांना आज हा विश्वासच होत नाहीये की ते जिवंतपणी या प्रसंगाला पाहात आहेत. रामलल्लासाठी एका भव्य मंदिराचं बांधकाम होणार आहे’, असं मोदी यावेळी म्हणाले. ‘आपल्या स्वातंत्र्य लढ्यावेळी कित्येक पिढ्यांनी आपलं सारंकाही समर्पित करून टाकलं. गुलामगिरीत एक क्षण असा नव्हता जेव्हा स्वातंत्र्यासाठी आंदोलन झालं नसेल. देशात अशी कोणती जमीन राहिली नव्हती, जिथे स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं गेलं नसेल. १५ ऑगस्टला त्या सगळ्यांच्या बलिदानाचं सार्थक झालं. त्याचप्रमाणे राम मंदिरासाठी कित्येक शतकांपासून कित्येक पिढ्यांनी अखंडपणे अविरतपणे प्रयत्न केले आहेत. आजचा हा दिवस त्याच त्यागाचं आणि संकल्पाचं प्रतीक आहे’, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
‘या काळात खूप प्रयत्न झाले. अस्तित्व मिटवण्याचा देखील प्रयत्न झाला. पण श्रीराम आपल्या मनात बसले आहेत. श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहेत. अयोध्येमध्ये या भव्यदिव्य मंदिराचं आज भूमिपूजन झालं. इथे येण्याआधी मी हनुमान गढीचं दर्शन घेतलं. प्रभू रामाचं सर्व काम हनुमानजीच करतात. त्यांच्या आशीर्वादानेच राम मंदिराच्या भूमिपूजनाचं हे काम सुरू झालं आहे. हे मंदिर आपल्या राष्ट्रीय भावनेतं, आस्थेचं, कोट्यवधी लोकांच्या सामुहिक संकल्पाचं प्रतीक बनेल. भावी पिढ्यांना आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा हे मंदिर देत राहील’, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणले. ‘हे मंदिर बनल्यानंतर अयोध्येची फक्त भव्यता वाढणार नाही, तर या क्षेत्राचं पूर्ण अर्थकारणच बदलून जाईल. इथे नव्या संधी तयार होतील, वाढतील. जगभरातून लोकं इथे येतील’, असं ते म्हणाले.
‘मित्रांनो, आज फक्त नवा इतिहास घडत नाही, तर इतिहास पुन्हा घडतोय. ज्या प्रमाणे मावळ्यांनी छत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेत निमित्त झाले, ज्याप्रमाणे गरीब, आदिवासी अशा समाजातल्या प्रत्येक वर्गाने स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींनी सहयोग दिला, त्याचप्रमाणे आज देशभरातल्या लोकांच्या सहकार्याने राम मंदिर निर्माणाचं हे पुण्यकार्य सुरू झालं आहे. आम्हाला माहिती आहे की ज्याप्रमाणे दगडांवर श्रीराम लिहून रामसेतून बनवला गेला, तशाच प्रकारे घराघरातून, गावागावातून पूजन केलेल्या शिला इथे आल्या. हे न भूतो, न भविष्यती असं आहे’, असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. आपल्याला सगळ्यांच्या भावनांना ध्यानात ठेवायचं आहे. आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांचा विकास करायचा आहे. श्रीरामाचं हे मंदिर युगानुयुगे मानवतेला प्रेरणा देत राहील. कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात प्रभू रामचंद्र सगळ्यांना सुखी ठेवोत या मी सर्व देशवासीयांना शुभकामना देतो’, असं म्हणत मोदींनी त्यांच्या भाषणाचा समारोप केला.