जळगाव रेल्वे दुर्घटनेत १२ प्रवाशांचा मृत्यू, ८ मृतदेहांची ओळख पटली
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्या जवळ रेल्वे अपघाताची मोठी घटना घडली. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत १२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून त्या पैकी ८ मृतदेहांची ओळख पटली आहे. तर १५ ते १६ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये ८ पुरुष व ३ महिला आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
पुष्पक रेल्वेनं अचानक ब्रेक दिल्यानं चाकांमधून ठिणग्या उडाल्या आणि आग लागल्याची अफवा उठली, या अफवेमुळे कोणतरी रेल्वेची चेन ओढली त्यामुळे ट्रेन थांबली अन् ३० ते ३५ प्रवाशांनी रेल्वेमधून खाली उडी मारली. मात्र त्याचवेळी समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसने या प्रवाशांना चिरडलं. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर १५ ते १६ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान हा अपघात प्रवाशांमध्ये निर्माण झालेल्या आगीच्या ज्वाळांनी तर भीतीमुळे झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
रेल्वेकडून अपघात प्रकरणी तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे, यात मृतांच्या कुटुंबियांसाठी ५ लाखांची मदत जाहिर करण्यात आली आहे, गंभीर जखमींसाठी ५० हजार, तर कायम अपगंत्व आलेल्या व्यक्तींसाठी २ लाख ५० हजार रुपयांची मदत जाहिर करण्यात आली आहे. तर मृतांच्या वारसांना राज्य शासनाकडूनही मदत जाहीर करण्यात आली आहे.
पाचोरा तालुक्यातील परधाडे ते माहेजी स्टेशन दरम्यान वडगाव बुद्रुक गावाजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये १२ मृतदेह हाती लागले असून ते जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे हलविण्यात आले आहे. तर काही जखमींवर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान अनेक मृतदेह हे कापले गेले असल्यामुळे अपघाताची भीषणता लक्षात येत होती.जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये एकूण १२ मृतदेह दाखल झाले आहेत. या १२ मृतदेहांपैकी ८ मृतदेहांची ओळख पटली आहे. यात ९ पुरुष आणि ३ महिला मयत आहेत.
हिंदू नंदराम विश्वकर्मा (वय ९ ते ११ रा. नेपाळ) लच्छी राम पासी (वय अंदाजे १८ ते २३ रा. नेपाळ) कमला नवीन भंडारी (वय ४३ रा. नेपाळ), जवकला बुट्टे जयगडी (वय ५०), नसिरुद्दीन बद्रुद्दीन सिद्दिकी (वय १८ ते २० रा.कोंडा) इम्ताज अली (वय ३५ रा. गुलऱीहा उत्तर प्रदेश) बाबू खान (वय २७ ते ३०) असे ओळख पटलेल्या मयत व्यक्तींचे नाव आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा