आमदारांनंतर शिवसेनेचे १२ खासदार भाजपला पाठिंबा देणार !
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शिवसेनेतील शिंदे गटाच्या बंडाने राज्याच्या राजकारण सत्तांतर झाले आता यापाठोपाठ शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणार असल्याचा दावा भाजपचे वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी केला आहे. शिवसेना आमदारांपाठोपाठ अनेक खासदार भाजपसोबत जाण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू असतानाच तडस यांनी थेट आकडाच सांगितल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे.
शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत ठाकरे सरकार पाडलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता सेनेचे खासदारदेखील आमदारांच्याच वाटेनं जात असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेनेच्या खासदारांमध्ये नाराजी असल्याचे सांगत सेनेचे तब्बल १२ खासदार एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार असल्याचा दावा तडस यांनी केला आहे. विकास कामांसाठी जनतेने निवडून दिले होते. मात्र, तीन वर्षात त्यांच्या मतदार संघात विकास कामे न झाल्याने या खासदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. विकास, देशाचे संरक्षण आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर नरेंद्र मोदी यांना साथ देण्यासाठी शिवसेनेचे १२ खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार असल्याचे मोठे वक्तव्य खासदार रामदास तडस यांनी केले आहे.
विकास कामांच्या मुद्यावरून भाजपसोबत युती करण्याची भूमिका शिवसेनेच्या अनेक खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे मांडली असल्याचे शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे शिवसेना आमदारांपाठोपाठ आता १२ ते १५ सेना खासदार भाजपसोबत जाण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यातच भाजपचे खासदार रामदास तडस यांनीच आता सेना खासदारांच्या नाराजीला दुजोरा देत लवकरच १२ खासदार एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याचा दावा केला आहे.
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, भावना गवळी यांनी अगोदरच भाजपला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेना खासदारांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे. यातील अनेक खासदार भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरू शकतात. तसे संकेत सेना खासदार लोखंडे यांनी देखील दिले आहेत. तसे झाल्यास आमदार फुटीच्या धक्क्यातून अद्याप न सावरलेल्या शिवसेनेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.