जामनेरात विद्यार्थिनीची आत्महत्या : पबजीच्या स्टेप्सप्रमाणे जखमा आणि मोबाईलमधील स्क्रीनशॉटमुळे वाढलं गूढ
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मंडे टू मंडे न्युज : जामनेर येथे एका बारावीत शिकणाऱ्या मुलीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. रविवारी सायंकाळी घरी एकटीच असताना, मुलीनं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली महत्त्वाचे म्हणजे मृत मुलीच्या हातावर पबजीच्या स्टेप्सप्रमाणे काही जखमा आढळल्या आहेत. तसेच तिच्या मोबाइलमध्ये पबजी गेमचे काही स्क्रिनशॉट्स देखील आढळले आहेत. त्यामुळे तिने पबजी टास्कद्वारे आत्महत्या केल्याचा दाट संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे, जामनेर येथील एका महाविद्यालयात बारावीच्या वर्गात नम्रता खोडके ही 20 वर्षीय तरुणी शिकत होती. दरम्यान रविवारी सायंकाळी घरी एकटीच असताना, तरुणीनं नगारखान्यातील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. मृत नम्रताच्या आईनं हा धक्कादायक प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करत आसपासच्या लोकांना घरी बोलावलं. शेजारील नागरिकांनी घरी येत दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तसेच तिला खाली उतरवून नागरिकांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मृत तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी इंग्रजी भाषेतून सुसाइड नोट लिहिली आहे. तसेच आपण वैयक्तिक कारणातून आत्महत्या करत असल्याचं तिने सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. परंतु तिच्या हातावर कोपऱ्यापर्यंत काही जखमा पोलिसांना आढळल्या आहेत. तसेच तिच्या मोबाइलमध्ये पबजी गेमचे काही स्क्रिनशॉट्स देखील आढळले आहे. संबंधित मुलीनं पबजी टास्कद्वारे आत्महत्या केली असावी, असा दाट संशय पोलिसांना आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.