गेटवे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू ; मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मुंबई मधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. या घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तसेच या बोटमधून १०१ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
मुंबईवरून एलिफंटाकडे नीलकमल ही बोट जात होती. मात्र, या बोटीला गेट ऑफ इंडियाजवळ ही बोट बुडाल्याची घटना घडली. या बोटेतून १०० पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. सुरुवातीला या बोट मधून ८० प्रवाशी प्रवास करीत असल्याचं समोर आलं होतं. ही दुर्घटना घडल्यानंतर लगेचच तातडीने मदतकार्य करण्यात आले. यावेळी नौदलाने या बोटीमधील १०१ प्रवाशांना सुरक्षित वाचवलं. तर या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अद्यापही नौदलाकडून आणि पोलिसांच्या समन्वयाने बचाव कार्य करण्यात येत आहे. यामध्ये चार नौदलाचे हेलिकॉप्टर, ११ नौदल क्राफ्ट आणि एक तटरक्षक दलाची नौका आणि तीन सागरी पोलीस नौका बचावकार्य करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मुंबई शहराजवळ अरबी समुद्रात नीलकमल कंपनीच्या एका प्रवाशी बोटीच्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत सायं.७.३० पर्यंत प्राप्त माहितीनुसार, बोटीतील एकूण प्रवाशांपैकी १०१ लोकांना सुरक्षित वाचवण्यात आलं आहे. नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदलाच्या डॉक्टरांनी सायंकाळी ७.३० पर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात ३ नौदलाचे जवान असून १० नागरिक आहेत. तसेच २ गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.