जामनेर रस्त्यावर भीषण अपघातात २ जागीच ठार, ३ जखमी; ६ महिन्याचे बाळ बचावले !
मंडे टू मंडे वृत्तसेवा: जामनेरमध्ये अपघाताची मालिका सुरूच आहे. जामनेरकडून पाचोरा जाणाऱ्या रस्त्यावर टाकळी गावाजवळ नागदेवता मंदिर परिसरात आज गुरुवारी सकाळी पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव आयशरने कारला कट मारल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. कार नाल्यात कोसळून त्यातील एक पुरुष व महिला जागीच ठार झाले असून तिघे गंभीर आहेत. सुदैवाने अपघातात ६ महिन्यांचे बाळ वाचले आहे.
भुसावळ येथील नागरिक पाचोरा येथे लग्नकार्याच्या निमित्ताने इंडिगो कार क्रमांक एमएच.१८.डब्ल्यू २४१२ ने निघाले होते. टाकळी गावाजवळ आल्यानंतर नागदेवता मंदिरापाशी अज्ञात भरधाव जाणाऱ्या वाहनाने इंडिगो कारला जबर कट मारला. परिणामी, इंडिका चालकाचा ताबा सुटला आणि कार साईड पट्टीवरुन नाल्यात जाऊन कोसळली. यामुळे इंडिगो कार मधील महिला व पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण अत्यवस्थ झाले. अपघातात सहा महिन्यांचे बाळ सुदैवाने बचावले असून त्यालाही जखमा असल्याने खाजगी हाँस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तर इतर जखमींना नागरिकांनी जामनेरच्या जी. एम. हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले.
अपघातात पंकज गोविंदा सैंदाणे (वय २५, रा. तुकाराम नगर), सुजाता प्रवीण हिवरे (वय ३०, रा. त्रिमूर्तीनगर दोघे रा. भुसावळ) हे ठार झाले आहेत. तर हर्षा पंकज सैंदाणे, नेहा राजेश अग्रवाल, प्रतिभा जगदीश सैंदाणे, ६ महिन्यांचा चिमुकला स्पंदन पंकज सैंदाणे हे जखमी झाले आहेत. स्पंदन याचे वडील पंकज यांचा अपघातात मृत्यू झाल्याने तो पितृप्रेमाला आता पोरका झाला आहे. तर त्याची आई हर्षा सैंदाणे ह्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. आयशर वाहनचालकाने वाहनासह पळ काढला असून त्याचा शोध सुरू आहे. अपघातात जामनेरसह जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.