खासदार नवनीत राणांच्या मुलांसह कुटुंबातल्या १० जणांना कोरोनाची लागण !
अमरावती (प्रतिनिधी)। खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबातील 10 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आज अहवाल आल्यानंतर स्पष्ट झालं आहे. या सदस्यांमध्ये राणांच्या मुलांचाही समावेश आहे. नवनीत आणि रवी राणा यांच्या मुलाला आणि मुलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय नवनीत राणा यांचे सासू-सासरे म्हणजे रवी राणा यांचे आई वडील नागपूरच्या व्होकहार्ट रुग्णालयात दाखल आहेत. त्यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी आहे.
बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांचे वडील आणि खासदार नवनीत राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट कालच पॉझिटिव्ह आला होता. या पार्श्वभूमीवर राणा यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीत 10 जणांना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये आमदार-खासदार पती-पत्नींच्या मुलांचा समावेश आहे. आमदार रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घ्यावी आणि लक्षणं असल्यास त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन कऱण्यात आलं आहे.