जुगार अड्ड्यावर धाड : ६९ लाखांचा मुद्देमालासह २७ जुगारी ताब्यात !
नाशिक, प्रतिनिधी : पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय, परिमंडळ 2 चे उपायुक्त विजय खरात आणि विभाग 4 चे सहाय्यक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या आदेशानुसार शहर पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रात कोणत्याही अवैध व्यवसाय सुरु राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. याच अनुषंगाने उपनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने नाशिकरोड, जेलरोडवरील कैलासजी सोसायटीत अवैध जुगार अड्ड्यावर धाड घालून तब्बल 27 जुगार्यांना अटक केली, तर रोख रकमेसह वाहने असा 68 लाख 92 हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नाशिक परिमंडळ 2 चे उपायुक्त विजय खरात यांना गुप्त खबर्यामार्फत सतीश रघुनाथ भालेराव हा इसम जेलरोडवर पाण्याच्या टाकीसमोर असलेल्या कैलासजी हौसिंग सोसायटीत बंदिस्त फ्लॅटमध्ये जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार धाड घालून फ्लॅटची झडती घेतली असता फ्लॅटमध्ये 27 जण जुगार खेळतांना आढळून आले. त्यांच्याकडून चारचाकी 5 वाहने, एक दुचाकी बुलेट व रोख रक्कम असा 68 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त करुन सर्व म्हणजे 27 जणांना अटक करण्यात आली.
दरम्यान त्यांच्याविरुद्ध फौजदारी कलम 93, कलम 100 यांसह महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 चे कलम 6 अन्वये गुन्हा नोंदवून याच कायद्यातील कलम 4 व 5 अन्वये कारवाई करण्यात आली. निवासी क्षेत्रात बेकायदा जुगार अड्डा चालविल्याबद्दल या इमारतीचे पाणीपुरवठा कनेक्शन बंद करावे आणि फ्लॅटचे भोगवटा प्रमाणपत्र रद्द करावे, यादृष्टिने महापालिका आणि वीजकंपनीकडे संपर्क साधण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक व्हि.एस.लोंढे हे करीत आहेत.