पॅरासिटामॉल सह दररोजच्या वापरातील ५३ औषधे गुणवत्ता दर्जा तपासणीत नापास, आरोग्याची चिंता वाढली
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l देशातील सर्वात मोठ्या औषध नियामक संस्थेने एक यादी जाहीर केली. प्रतिजैविके, पॅरासिटामॉलसह मधुमेह, रक्तदाबावरील औषधांसह ५३ औषधे दर्जा चाचणीत अपयशी ठरली आहेत. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या देशातील सर्वात मोठ्या औषध नियामक संस्थेने या औषधांची यादी बुधवारी जाहीर केली.या यादीत व्हिटॅमिन सी आणि डी-३ टॅब्लेट शेल्कल, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सॉफ्टजेल, अँटिसीड पॅन-डी, पॅरासिटामॉल गोळ्या आयपी ५०० एमजी, मधुमेहावरील औषध ग्लिमेपिराईड आणि उच्च रक्तदाब औषध टेलमिसार्टनही गुणवत्ता चाचणीत अयशस्वी ठरले आहे.
क्लोनाझेपम टॅबलेट, वेदनाशामक डायक्लोफेनाक, श्वसनरोगावरील अँब्रोक्सोल, बुरशीरोधक फ्लुकोनाझोल आणि काही मल्टिव्हिटॅमिन आणि कॅल्शियम गोळ्यांचाही बंदी घातलेल्या औषधांच्या यादीत समावेश आहे. ही औषधे हेटेरो ड्रग्ज, अल्केम लेबोरेटरीज, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड, कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडसारख्या बड्या कंपन्यांनी बनवलेली आहेत. याआधी चालू वर्षात ऑगस्टमध्ये १५६ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घालण्यात आली होती.
५३ पैकी ५ औषधे बनावट
पोटाच्या संसर्गासाठी दिले जाणारे मेट्रोनिडाझोल हे औषध हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेडने तयार केले आहे, तेही या चाचणीत अपयशी ठरले आहे. टोरेंट फार्मास्युटिकल्सच्या शेल्कल गोळ्याही चाचणीत अपयशी झाल्या. चाचणीत अयशस्वी ठरलेल्या ५३ औषधांपैकी ५ औषधे बनावट होती. ही बनावट औषधे आम्ही बनवलेली नसून, आमच्या नावाखाली बाजारात खपत असल्याचे औषध उत्पादक कंपन्यांनी म्हटलेले आहे.
औषध नियामकाने गुणवत्तेच्या चाचण्यांमध्ये अयशस्वी झालेल्या औषधांच्या दोन याद्या सामायिक केल्या आहेत. त्यापैकी ४८ लोकप्रिय औषधांचा समावेश आहे. दुसऱ्या यादीत अतिरिक्त ५ औषधे आहेत. जे चाचणीत अनुत्तीर्ण आढळले आहेत. त्याचवेळी या औषध कंपन्यांनी जबाबदारी घेण्यास नकार देत ज्या औषधांची चाचणी झाली आहे. ते ‘बनावट’ आहेत.
ऑगस्ट मध्ये सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन कडून घालण्यात आली होती १५६ औषधांवर बंदी
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने एका पेक्षा जास्त कॉम्बिनेशन असलेल्या १५६ फिक्स्ड डोस ड्रग्स (FDCs) वर ऑगस्ट मध्ये बंदी घातली होती. FDC ही अशी औषधे आहेत जी दोन किंवा अधिक औषधांची रसायने (क्षार) ठराविक प्रमाणात मिसळून बनवली जातात. यादीमध्ये अनेक औषधांवर बंदी घालण्यात आली आहे, ज्यात एसेक्लोफेनाक ५० मिलीग्राम आणि पॅरासिटामॉल १२५ मिलीग्राम गोळ्या, पॅरासिटामॉल आणि ट्रामाडॉल, टॉरिन आणि कॅफीन आणि एसेक्लोफेनाक ५० मिलीग्राम आणि पॅरासिटामोल १२५ मिलीग्राम गोळ्या यांचा समावेश आहे.