अधिक नफ्याचे अमिष दाखवून ८ लाखांची ऑनलाईन फसवणूक
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास तुम्हाला मोठा नफा मिळवून देतो. असे अमिष दाखवत भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील एका नोकरदाराची तब्बल ८ लाख १२ हजार रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली.
मिळालेली अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील साकेगाव रहिवासी असलेले व सध्या मुंबईत नोकरीला असलेले कर्मचारी सुटी घेऊन गावी आले होते. त्या वेळी दिनांक ६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान त्यांच्याशी तीन जणांनी व्हाटस्ॲपवर संपर्क साधून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफ्याचे अमिष दाखविण्यात आले व त्यांना एक लिंक पाठविली व टेलिग्राम मध्ये ॲड केले. त्यानुसार त्यांनी ८ लाख १२ हजार रुपये अशी मोठी रक्कम गुंतविली. त्या गुंतवणुकीवर नफा देण्यात येऊन विश्वास संपादन केला.
मात्र त्यांना त्या नंतर तक्रारदाराला कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यावरून फसवणूक करणाऱ्या तीन अनोळखींविरुद्ध १८ ऑक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी जळगाव सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.