आ.अमोल जावळे यांची पाल ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट : अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांच्या बेफिकिरीवर संताप, तत्काळ कारवाईचे आदेश
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पाल (ता. रावेर) येथील ग्रामीण रुग्णालयाला आमदार अमोल जावळे यांनी आज अचानक भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयात केवळ दोन कर्मचाऱ्यांची उपस्थिती, तसेच ठिकाणी अस्वच्छता आणि विदारक परिस्थिती पाहून आमदार जावळे यांचा पारा चढला. त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्याशी संपर्क साधून या परिस्थितीची तक्रार नोंदवली.
यावेळी आमदार जावळे यांनी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आदिवासी रुग्णांची विचारपूस केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना योग्य त्या सुविधा तत्काळ पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पाल ग्रामीण रुग्णालयात केवळ एक परिचारिका आणि एक स्वच्छता कर्मचारी उपस्थित असल्याचे आढळले. वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी मात्र गैरहजर होते. हे रुग्णालय सुमारे 23 ते 25 आदिवासी गावांना आरोग्य सेवा पुरवते, परंतु कर्मचारी कायम अनुपस्थित राहत असल्याने रुग्णांना रावेर येथे उपचारासाठी जावे लागते.
रुग्णालयातील अस्वच्छता हा मोठा प्रश्न ठरला आहे. पुरुष आणि स्त्री विभागात स्वच्छतेचा अभाव दिसून आला, औषधांची पॅकेट्स उघड्यावर पडलेली होती, आणि संपूर्ण रुग्णालयात घाणीचे साम्राज्य होते.
रुग्णालयातील स्थिती पाहून आमदार जावळे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी गैरहजर कर्मचारी आणि अस्वच्छतेविषयी तक्रार करत तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
आदिवासी रुग्णांशी संवाद साधताना त्यांनी उपचाराबाबत माहिती घेतली आणि त्यांना आधार दिला. “तुमच्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास माझ्याशी संपर्क साधा,” असे त्यांनी रुग्णांना आश्वासन दिले.
सिव्हिल सर्जनची रुग्णालयाला भेट:
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावर तात्काळ दखल घेतली असून, सिव्हिल सर्जन डॉ. किरण पाटील यांना उद्या पाल ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.
“शासनाकडून कोट्यवधी रुपये आदिवासी व रुग्णसेवेसाठी खर्च होत आहेत. तरीही अधिकारी व कर्मचारी बेफिकिरीने वागत असतील, तर ते सहन केले जाणार नाही. रुग्णालयात स्वच्छता आणि आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाला तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत,” अश्या भावना आमदार अमोल जावळे यांनी यावेळी व्यक्त केल्या. आमदार जावळे यांनी जनतेच्या आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी घेतलेल्या या पवित्र हेतूमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा