५० लाखांच्या विम्यासाठी रचला अपघाताचा कट..पण… गेम फसला… ४ पोलिस, डॉक्टर, विमा प्रतिनिधीसह आठ जणांवर गुन्हा दाखल
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सुमारे एक वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव करून चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील एका प्रख्यात डॉक्टरासह काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ५० लाखांचा विमा हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्यावर दुचाकीस्वाराच्या बनावट अपघाताच्या माध्यमातून ५० लाख रुपयांचा विमा मिळवण्याचा कट उघडकीस आला आहे. या प्रकरणात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांसह वैद्यकीय अधिकारी आणि मेहुनबारे पोलिस ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी अशा आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलीय. या कारवाईने खळबळ उडाली.अतिक्रमण हटाव सेवा या
अटक करण्यात आलेल्यांमध्ये चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करंबळेकर, मेहुणबारे पोलिस ठाण्यातील कर्मचारी महेंद्र पाटील, रवींद्र बत्तीशे, सचिन निकम, सुनील निकम यांच्यासह मृताची पत्नी अरुणा जाधव, भाऊ मिथुन जाधव आणि विमा प्रतिनिधी प्रवीण पाटील यांचा समावेश आहे. .
मालेगाव येथील राजेंद्र जालंदर जाधव यांचा १९ एप्रिल २०२५ रोजी दहिवद फाट्यावर अपघातात मृत्यू झाल्याची तक्रार मेहुणबारे पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. कारने धडक दिल्याने त्यांचा चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्याचे दाखविण्यात आले होते. मृताचे वारसदार म्हणून पत्नी अरुणा जाधव यांनी ३ मे २०२५ रोजी पर्सनल एक्सीडेंट विमा कंपनीकडे ५० लाखांच्या विम्याचा दावा दाखल केला.
विमा कंपनीने चौकशी केल्यानंतर तपासात राजेंद्र जाधव यांचा मृत्यू प्रत्यक्षात २३ फेब्रुवारी २०२४ रोजी यकृताच्या आजाराने झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या घरातील फोटोवरही हीच मृत्यूची तारीख होती. तसेच ग्रामपंचायत मृत्यू नोंदणी रजिस्टरमध्येही त्यांची नोंद नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले.
दरम्यान, आणखी धक्कादायक बाब म्हणजे मृताच्या नावावर विविध कंपन्यांकडून सुमारे दहा विमा पॉलिसी काढण्यात आल्याचे आणि त्यावर दावे करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे बनावट पद्धतीने विमा रक्कम मिळवून देणारी टोळी उघडकीस आली असून तपासात असेही समोर आले आहे की, केवळ एका कंपनीलाच नव्हे तर अशाच पद्धतीने सुमारे दहा वेगवेगळ्या विमा कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणातून जवळपास सात ते आठ कोटी रुपयांचा विमा घोटाळा उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

