मुक्ताईनगर येथील दाम्पत्याच्या कारला कंटेनरची धडक,पत्नीचा मृत्यू तर पतीसह ३ मुले गंभीर जखमी
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शिर्डी हून मुक्ताईनगर ला परतताना मुक्ताईनगर मधील आश्रम शाळेचे मुख्याध्यापक राजेश पाटील कुटुंबाच्या कारला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघातात पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर पतीसह ३ मुले गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवार २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२.३० वाजता एरंडोल ते धरणगाव दरम्यानच्या पिंपळकोठा गावाजवळ घडली आहे.
मुक्ताईनगर येथील शिक्षक राजेश वासुदेव पाटील (वय ४६) हे पत्नी रुपाली पाटील (वय ४०) आणि तीन मुलांसह शिर्डीला देवदर्शनासाठी गेले होते. सोमवारी २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२.३० वाजता मुक्ताईनगरकडे कार ने परत येत असताना एरंडोल ते जळगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर यूपी ढाब्यासमोर अचानक आलेल्या कंटेनरने (डब्लू बी २३ एफ ९४७२) त्यांच्या मारुती स्विफ्ट कारला (एमएच १९ सिक्यू ७००९) रस्त्यावर अचानक मागून धडक दिली. धडकेनंतर कार रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळली. हा अपघात इतरका भीषण होता, की अपघातात राजेश पाटील यांच्या पत्नी रुपाली पाटील आणि तीन मुलं – खुशी, स्वरा आणि गुरु हे सर्व जण गंभीर जखमी झाले.
पत्नीचा जागीच मृत्यू
अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे जखमींना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी रुपाली पाटील यांना मृत घोषित केले. त्याचवेळी तीन मुलांना एरंडोल येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजेश पाटील हे मुक्ताईनगर येथील कोथळी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक तथा पत्रकार आहेत.
कंटेनर चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात?
फिर्यादी राजेश पाटील यांच्या म्हणण्यानुसार, कंटेनर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अचानक वाहन रस्त्यावर आणल्यामुळे अपघात झाला. त्यांच्या पत्नीच्या मृत्यूला आणि मुलांच्या दुखापतीस कंटेनरचालकच जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
