नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत दांपत्याची लाखो रुपयांची फसवणूक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l कंपनीची एजन्सी देऊन त्यातून नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवत जळगाव मधील गणेश कॉलनीतील दांपत्याकडून वेळोवेळी १८ लाख ९१ हजार ५२ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी २४ सप्टेंबर मंगळवार रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात उत्तरप्रदेश राज्यातील नोएडा येथील चौघां विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील गणेश कॉलनीत दीपक गोपीचंद नाथांनी . वय-५० वर्ष गणेश कॉलनी. जळगाव. हे व्यावसायिक परिवारासह वास्तव्यास असून त्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्याने ते ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने काम ऑनलाईन शोधत होते. त्यावेळी त्यांना एका कंपनीची जाहिरात दिसली. त्या वेळी त्यांनी जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता त्रिदेव वढेरा उर्फ आकाश अरोरा, निशु गुप्ता, कुणाल शर्मा व मनीष कुमार. सर्व रा. नोएडा राज्य उत्तर प्रदेश. यांनी त्यांच्या दोन्ही कंपनी एकत्रितपणे काम करत असल्याचे सांगितले व कंपनीची फ्रन्चाईसी देवून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
दीपक नाथानी व त्यांची पत्नी ज्योती दीपक नाथांनी यांच्याकडून बीपीओ कंपनीचे डेटा व्हेरिफिकेशनच्या कामाकरिता करारनामा करून देतो असे सांगितले. त्यानुसार चौघांनी डिपॉझिट व सर्व्हरसाठी एकूण १८ लाख ९१ हजार ५२ रुपये रक्कम स्वीकारली. त्यानंतर दीपक नाथाणी यांच्यासोबत कोणतीही करार केला नाही व त्यांना पैसे देखील परत केले नाहीत.
दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नाथांनी दांपत्याने मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयित आरोपी त्रिदेव वढेरा उर्फ आकाश अरोरा, निशू गुप्ता, कुणाल शर्मा व मनीष कुमार या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख या करीत आहेत.