पाचशेच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक मधील अंबड पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून टोळीला अटक करण्यात आली आहे. नाशिकमध्ये बनावट नोटा छापण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचं समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आरोपींनी या नोटा चलनात आणल्याचं देखील समोर आलं आहे.
अधिक माहिती अशी की, एक टोळी नाशिकमध्ये बनावट नोटा छापण्याचं काम करीत होती. खऱ्या नोटा स्कॅन करून प्रिंटरवरून त्याच्या प्रिंट काढून बनावट नोटा तयार करण्यात येत होत्या. पाचशेच्या बनावट तयार करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करताना अंबड पोलिसांनी या टोळीला रंगेहाथ अटक केली आहे.या संदर्भात पोलिसांनी अशोक पगार, हेमंत कोल्हे, नंदकुमार मुरकुटे या तिघांना अटक केली आहे. सिन्नरच्या एका हॉटेलमध्ये प्रिंटरच्या मदतीने पाचशेच्या बनावट नोटा छापल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी बनावट मोठा छापण्यासाठी वापरण्यात आलेला प्रिंटर आणि लॅपटॉप देखील हस्तगत करून पाचशे रुपयांच्या ४७ बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
या आरोपींनी पाचशेच्या दोन बनावट नोटा खऱ्या नोटांमध्ये लपवल्या होत्या. त्यांनी त्या एका खाजगी बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये चलनात देखील आणल्याची कबुली दिल्याचं अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितलं आहे.