भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

बनावट नोटा बनवणारं मोठं रॅकेट उघड, घरातच सुरू होता नोटा बनवण्याचा कारखाना, करोडो रुपये चलनात

अहिल्यानगर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | बनावट नोटांचे एक मोठे रॅकेट उघडकीस आले असून राहुरी- पोलिसांनी अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात ही मोठी कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ६६ लाख रुपये किमतीच्या नकली नोटांसह नोटा तयार करण्यासाठी लागणारे ४ लाख रुपये किमतीचे साहित्य, असे एकूण ७० लाख ७३ हजार ९२० रुपये किमतीचे सामान जप्त करण्यात आले आहे.

राहुरी शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक मोठं बनावट नोटांचं रॅकेट उघडकीस आलं आहे. सुरुवातीला केवळ २ लाखांच्या बनावट नोटांसह तिघांना अटक करण्यात आली असली तरी पुढील तपासात ६६ लाख रुपयांच्या बनावट नोटा, प्रिंटिंग मशिनरी व कागद साहित्यासह मोठं रॅकेट उघडकीस आलं आहे. या कारवाईनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगरहून तीन व्यक्ती मोटरसायकलवरून बनावट नोटा घेऊन राहुरीकडे येत आहेत.अशी गुप्त माहिती राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली. यावर त्यांनी तत्काळ पोलीस पथकासह राहुरी शहरातील नगर-मनमाड रस्त्यावरील गाडगे महाराज आश्रम शाळा परिसरात सापळा रचला. थोड्याच वेळात एमएच ४५ वाय ४८३३ क्रमांकाच्या दुचाकीवर तीन व्यक्ती तेथे दाखल झाले. पोलिसांनी त्यांना अडवताच अंगझडतीत २०० आणि ५०० रूपयांच्या एकूण २ लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. ॲक्सिस बँकेचे मॅनेजर कैलास वाणी यांनी या नोटा बनावट असल्याची खातरजमा घटनास्थळीच केली.

या प्रकरणी पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार (वय ३३, रा. अर्जुननगर, ता. करमाळा, जि. सोलापूर), राजेंद्र कोंडीबा चौघुले (वय ४२ ) आणि तात्या विश्वनाथ हजारे (वय ४० – दोघेही रा. पाटेगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू असून या चौकशीत आरोपींनी धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितले की, या नोटा सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे तयार करण्यात आल्या आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ टेंभुर्णी येथे छापा टाकला. या छाप्यात ६६ लाख रुपयांच्या बनावट नोटा, नोटा छापण्यासाठी विशेष कागद, प्रिंटर, झेरॉक्स मशिन आणि इतर साहित्य सापडले. या कारखान्याचा वापर मोठ्या प्रमाणावर बनावट चलन तयार करण्यासाठी होत होता हे यावरून स्पष्ट झालं.

प्रकरणाचा अधिक तपास सुरू : या बनावट नोटा कोणाला देण्यासाठी आणल्या होत्या? आधी कुठे कुठे वापरण्यात आल्या आहेत? आणि अजून किती रक्कम चलनात मिसळली आहे? याचा सविस्तर तपास सुरू असून या गुन्ह्यात अजून कोणी सहभागी आहेत का? हेही तपासाअंती स्पष्ट होणार असल्याचं पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितलं. या प्रकरणात पुढील तपासात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!