गर्भवती महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना साडी नेसून ड्युटी करण्याची परवानगी
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्य सरकारने राज्यातील महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे. महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर साडी नेसण्याची परवानगी दिली आहे. तथापि, त्यांना सूट मिळविण्यासाठी गर्भधारणेचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .असा आदेश राज्य सरकारने बुधवार ९ ऑक्टोबर रोजी काढला आहे.
राज्य सरकारने महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर साडी नेसण्याची परवानगी दिली आहे. या साठी गर्भधारणेचे वैद्यकीय प्रमाणपत्र संबंधितांना सादर करणे आवश्यक आहे. गर्भधारणेचे पाहिले काही महीने काळजी घेणे गरजेचे असते. या काळात महिलांनी पोटावर बेल्ट घातल्यास याचे गंभीर परिणाम संबंधित महिलेच्या तब्बेतीवर किंवा गर्भधारणेवर होऊ शकतात. तसेच गणवेश घलण्यातही अडचणी येतात. महिला पोलिस कर्मचाऱ्यांची ही अडचण पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
गर्भधारणेच्या काळात यापूर्वी गणवेश परिधान करण्यास सूट देण्याचा प्रस्ताव डीजीपी कार्यालयाने पाठविला होता. जो गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारकडे प्रलंबित होता. या बाबत बुधवारी सरकारने गर्भधारणा काळात गणवेश परिधान करण्याबाबत शिथिलता देणारा शासन निर्णय (GR) जारी केला आहे.