बिबट्याचे मृतावस्थेत पिल्लू आढळल्याने यावल तालुक्यात खळबळ, हे “तेच” पिल्लू !
फैजपूर, ता. यावल. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यात सध्या गाव वस्ती कडे बिबट्याचा संचार वाढला आहे. यावल तालुक्यातच गेल्या काही महिन्यापूर्वी लहान बालकाला उचलून नेले. काहींवर हल्लाकेल्याच्या घटना घडल्या. तसेच काही दिवसांपूर्वी यावल तालुक्यातील पाडळसा शेत शिवारात बिबट्या दिसून आला होता. यावल तालुक्यातील दहिगाव शिवारात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले होते मेंढपाळांची बकरी व कुत्रा लांबविण्याची घटना दि.२ मे २०२५ रोजी घडली. यामुळे परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले . त्याच प्रमाणे डोंगर कठोरा भागातील मोहाडी शेत शिवारात बिबट्या आपल्या बछड्यासह २४ एप्रिल २०२५ रोजी आढळून आला होता.
यावल-तालुक्यातील डोंगरकोठारा शिवारात २४ एप्रिल रोजी मादी बिबट्या व तिचे पिल्लू शेतकऱ्यांच्या पुढ्यात येऊन ठाकले होते. या पैकी अंदाजे नऊ महिन्यांच्या वयाचे एक पिल्लू रविवारी सकाळी शिवारातील केळीच्या बागेत मृतावस्थेत आढळून आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पिल्लूचा मृतदेह आढळताच ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. यावल वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे, वनपाल तडवी यांच्यासह वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृत पिल्लूचे शवविच्छेदनासाठी तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
या पूर्वी दिनांक २४ एप्रिल गुरुवार रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील मोहाळी शिवारात शेतकरी मनोहर बळीराम पाटील यांच्या शेतात सदर शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या केळीच्या बागेला पाणी भरत असतांना त्यांच्या पुढ्यात समोरच बिबट्या आल्याने मनोहर पाटील घाबरलेल्या अवस्थेमध्ये हळूहळू मागे सरकत असतांना लागलीच त्यांच्या पुढ्यात एक बिबट्याचे लहान पिल्लू त्यांच्या पायावर पडले. त्यांच्या पायावर बिबट्याचा पाय पडल्यामुळे ते खाली पडले व मोठमोठ्याने आरडाओरड करू लागले.त्यांना कोणत्यातरी प्राण्याने एका बोकडाला आताच खाल्ले असल्याचे त्या बिबट्याच्या तोंडाला लागलेल्या रक्तावरून लक्षात आले. त्याचवेळी त्यांच्यापुढे आणखी दुसरा मादी बिबट्या येऊन उभा राहिला. त्या मादी बिबट्याच्या तोंडाला रक्त लागलेलं होतं.
त्यांच्या ओरडण्याने त्यांची पत्नी व परिसरातील शेतकरी वेळीच आरोळ्या मारत धावून आल्याने सदरील दोन्ही लहान-मोठे बिबटे हे जंगलात पळून गेले होते. यामुळे मनोहर पाटील यांचा जीव वाचला होता. व ते या घटनेतून सुखरूप बाहेर आले. मात्र ही घटना गावात व परिसरात माहिती होताच या घटनेने परिसरात कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कदाचित” तेच ” बिबट्याचे पिल्लू हे असावे असा अंदाज व्यक्त केला जात असून रविवार २२ जून रोजी सकाळी अचानक पिल्लू मृतावस्थेत आढळल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून पिल्लाच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.


