शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ; निकष पूर्ण न करणाऱ्या शाळांना ‘ग्लोबल’, ‘इंटरनॅशनल’ शब्द लावण्यास सक्त मनाई !
पालकांची केली जातेय दिशाभूल
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यातील अनेक खासगी शाळांनी पात्रता निकष पूर्ण केले नसतानाही ‘ग्लोबल’, ‘इंटरनॅशनल’, ‘सीबीएसई इंग्लिश मीडियम’ अशी नावे लावली आहेत. ही कृती बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत त्यांच्या नावात बदल करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पानझडे यांनी याबाबत माहिती दिली.
शिक्षण विभागाच्या राज्य प्राधिकरणाकडे नावांबाबत येणाऱ्या अनेक प्रस्तावांमध्ये शाळांची नावे, माध्यम व मंडळ संलग्नता यामध्ये तफावत आढळून येत आहे. काही शाळा राज्य मंडळाशी संलग्न असताना त्यांच्या नावात ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’, ‘सीबीएसई’ अशा शब्दांचा वापर करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.
उपरोक्त परिस्थिती लक्षात घेता शाळांच्या नावामध्ये उपरोक्त इंटरनॅशनल, ग्लोबल, सीबीएसई, इंग्लिश मिडीयम, (International, Global, CBSE, English Medium) शब्दांचा उपयोग करुन शासनाची, समाजाची, पालकांची, विद्यार्थ्यांची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा समाजावर प्रतिकूल परिणाम होवू शकतो ही पार्श्वभूमी लक्षात घेता स्वयंअर्थसहाय्यित नवीन शाळा मान्यता/दर्जावाढ प्रस्तावांच्या छाननीसाठी आयोजित राज्यस्तरीय प्राधिकरणाच्या दि.१०.१२.२०२५ च्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा करण्यात आली आणि याबाबत पालक, विद्यार्थी यांच्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असलेल्या शाळांच्या नावामध्ये उपरोक्त नमूद शब्द किंवा त्याअनुषंगाने असणारे शब्द अशी नावे देण्यामागील पार्श्वभूमी काय आहे हे स्पष्ट होणे आवश्यक आहे, करीता असे शब्द असणाऱ्या शाळांची नावे बदलण्याबाबत संबंधित शाळांना सूचित करण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार यापुढे शाळा मान्यतासाठी नव्याने येणारी प्रकरणांची तपासणी करतांना शाळेचे नाव, त्यांचे मंडळ व माध्यम, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्या संस्थेद्वारे चालविल्या जाणाऱ्या अन्य शाळा, इ. चा सर्वंकष विचार करुन पालक व विद्याध्यर्थ्यांवर प्रतिकुल परिणाम होईल अशी नावे असल्यास ती नावे बदलण्याबाबत संबंधित संस्थांना कळविण्यात यावे, तद्नंतर अशा शाळांची शिफारस राज्य प्राधिकरणाकडे करण्यात यावी. सदर बाब क्षेत्रस्तरावरील सर्व अधिकारी व शाळा व्यवस्थापन यांच्या निदर्शनास आपल्या स्तरावरुन निदर्शनास आणून द्यावी. सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांच्या नावामध्ये उपरोक्त नमूद प्रकारचे शब्द आहेत याबाबत आपल्या स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी. माहे डिसेंबर २०२५ मध्ये राज्य प्राधिकरणाकडे प्राप्त प्रकरणांपैकी सोबत जोडलेल्याप्रमाणे ११ प्रकरणांमध्ये क्षेत्रस्तरावरुन नावाबाबत खातरजमा करुन फेर प्रस्ताव सादर करावेत.
शिक्षण संचालनालयाच्या सर्व अधिकाऱ्यांना सक्त सूचना
यापुढे शाळांच्या नावाबाबत पालक आणि विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होईल अशी नावे आढळल्यास ती नावे बदलण्याबाबत संबंधित संस्थांना कळविण्यात यावे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची शिफारस राज्य प्राधिकरणाकडे करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
अशा घटना क्षेत्रस्तरावरील सर्व अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापनाने आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्याव्यात.
राज्यस्तरीय बैठकीत निर्णय
प्रत्यक्षात अशा शब्दांचा वापर करण्यासाठी संबंधित शाळेची आंतरराष्ट्रीय पातळीवरील संलग्नता असणे आवश्यक आहे; परंतु परवानगी नसतानाही नावापुढे असे शब्द लावले जातात, असे शिक्षण विभागाला तपासणीमध्ये आढळून आले.
या प्रकारांमुळे पालक व विद्यार्थ्यांची दिशाभूल होण्याची शक्यता असून समाजावर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा नाव अधिकृत नसेल तर संबंधित शाळांना नाव बदलण्याबाबत सूचना देण्याचा निर्णय १० डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला.
सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांच्या नावांबाबतही क्षेत्र स्तरावर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले असून डिसेंबर २०२५ मधील ११ प्रकरणांचे फेरप्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले असल्याचेही पानझडे यांनी स्पष्ट केले.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

