विधानसभा निवडणूकपूर्वी मोठ्या घोषणांचा पाऊस : दर महिन्याला १५०० रुपये महिलांसाठी, प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या. या घोषणांमध्ये महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यापासून अनेक मोठ्या घोषणा केल्या.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. “महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे. महिला धोरण आपण जाहीर केले होते. त्यात वेळोवेळी बदल केले. नुकतेच अष्टसुत्री महिला धोरण जाहीर केलं आहे. महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार, लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृयोजना आपण आणल्या. घर खरेदी साठी मुद्रांक शुल्क योजना, नोकरदार महिलांना करातून सूट, शक्ती योजना आदी योजना राबवत आहोत. स्त्री समाजाचा केंद्रबिंदू होत आहे. महिला कुटुंब आणि अर्थार्जन अशा दोन्ही पातळीवर महिला काम करत आहेत. मुली परीक्षांमध्ये अव्वल असतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण घोषित करत आहोत.महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबणासाठी २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना दर महा १५०० रुपये देणार. या योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटी देण्यात येईल. जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल”, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.
महिलांसाठी मोठमोठ्या घोषणा
सन २०२३ -२४ पासून ‘लेक लाडकी’ योजनेची सुरुवात- मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये-दरवर्षी सुमारे ४६ हजार कोटी रुपये निधी
दिनांक १ मे, २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नांव, आईचे नांव, वडिलांचे नांव व आडनांव या क्रमाने करण्याचे बंधनकारक
पिंक ई रिक्षा – १७ शहरांतल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य – ८० कोटी रुपयांचा निधी
“शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह” योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान १० हजार रुपयांवरून २५ हजार रुपये
राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे आणि साहित्यासाठी ७८ कोटी रुपये
रुग्णांची विशेषतः गरोदर माता आणि बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने-आण करण्यासाठी ३ हजार ३२४ रुग्णवाहिका
जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील १ कोटी २५ लाख ६६ हजार ९८६ घरांना नळजोडणी पूर्ण- राहिलेल्या २१ लाख ४ हजार ९३२ घरांसाठीचे काम प्रगतीपथावर
‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’- वर्षाला घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार- ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना लाभ
लखपती दिदी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ७ लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत १५ हजार रुपयांवरुन ३० हजार रुपये वाढ
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ याद्वारे आतापर्यंत १५ लाख महिला ‘लखपती दिदी’, या वर्षात २५ लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट
महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’- अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन
‘आई योजनेअंतर्गत’ पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना १५ लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा – १० हजार रोजगार निर्मिती
मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित ८ लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के प्रतिपूर्ती
या निर्णयाचा अंदाजे २ लाख ५ हजार ४९९ मुलींना लाभ-सुमारे २ हजार कोटी रुपयांचा भार