लेवा पाटीदार समाज मंडळ, कल्याण, युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत, कल्याण शहर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन
कल्याण, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दि. 08 मार्च 2026 रोजी गणेश विद्या मंदिर, गणेश वाडी, कल्याण (पूर्व), कोळसेवाडी येथे लेवा पाटीदार समाज मंडळ, कल्याण, युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत, कल्याण शहर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उत्साहपूर्ण कार्यक्रम मोठ्या आनंदात पार पडला.
या कार्यक्रमाला कल्याण पूर्व व कल्याण पश्चिम परिसरातील अनेक लेवा माता-भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. महिलांसाठी मनोरंजन व सहभाग वाढवण्यासाठी विविध खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगीत खुर्ची, बास्केटबॉल, चमचा-लिंबू, नृत्य, नाटक, गायन अशा विविध स्पर्धांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. भाग्यश्री ताई पाचपांडे (सचिव, भोरगाव लेवा पाटीदार पंचायत मुंबई विभाग), श्री मयुरेश नरेंद्र कोल्हे (युवा समिती प्रमुख, भोरगाव लेवा पाटीदार पंचायत मुंबई विभाग), सौ. गायत्री ताई चौधरी, श्री तुषार चौधरी, युवराज सर,विनय धांडे,सागर बोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. मोनाली राणे, सौ. गायत्री ताई चौधरी, सौ. रुपाली कोलते,प्रणाली बेंडाळे,शीला नेमाडे तसेच लेवा नारीशक्ती महिला मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले व मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमात लकी ड्रॉद्वारे एका भाग्यवान महिलेला स्मार्ट वॉच बक्षीस देण्यात आले तसेच विविध खेळांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
महिला दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम महिलांच्या एकतेचा, उत्साहाचा आणि सशक्तीकरणाचा सुंदर उत्सव ठरला.
लेवा पाटीदार समाज मंडळ, कल्याण आणि युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत, कल्याण शहर यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
