भरधाव बसची दुचाकीला जबर धडक, यावल तालुक्यातील दुचाकीस्वाराचा मृत्यू
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |यावल तालुक्यातील किनगाव येथील शेतकी शाळेसमोर भरधाव बसने दुचाकीस्वाराला जबर धडक दिल्याने अशोक सपकाळे या दुचाकीवरील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दि. २६ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. अशोक यशवंत सपकाळे (वय ६८, रा. किनगाव ता. यावल) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गावात पत्नी, मुलगा, सून, ३ मुली यांचेसह राहत होते. एका बँकेत काम करून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यानंतर ते शेती काम करीत होते.
किनगाव येथून शेताकडे बुधवारी सकाळी अशोक सपकाळे जात असताना त्यांची दुचाकी (एमएच १९ एटी ८५८८) शेतकी शाळेसमोर आली असताना एसटी महामंडळाची बस (एमएच १४ बीटी २१४४) हिने अशोक सपकाळे यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.
या धडकेत अशोक सपकाळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना किनगाव आरोग्य केंद्रात आणल्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले होते. जळगाव रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे किनगाव येथे शोककळा पसरली आहे. यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.