निवडणूक ड्युटी आटोपून घरी जाणाऱ्या शिक्षकाचा अपघातात जागीच मृत्यू
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l निवडणूक कामाची कर्तव्य बजावून ड्युटी आटोपून दुचाकीवरून घरी जाणाऱ्या शिक्षकाचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. शिरपूर तालुक्यातील शिक्षक निवडणूक कामाची ड्युटी आटोपून गावी जात असताना चोपडा-शिरपूर रस्त्यावर गलंगी चौकात दुचाकी अपघातामध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दि. २० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे.
लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (वय ४९ रा. बभळाज ता. शिरपूर) हे चोपडा तालुक्यातील अनवर्दे बुधगाव येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. परिवारासह ते गावात राहत होते. दरम्यान त्यांची निवडणुकीनिमित्त शासनाने ड्युटी लावली होती. मतदान कर्तव्यावर असताना व काम आटोपून घरी बभळाज गावी रात्री परत जात असताना संध्याकाळी ७ वाजेनंतर हातेड गलंगी दरम्यान व चोपडा शिरपूर रस्त्यावर गलंगी चौकात त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला.
त्यांना नागरिकांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे त्यांना मयत घोषित करण्यात आले. घटनेबद्दल चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे लक्ष्मीकांत पाटील यांच्या परिवारावर शोककळा पसरली आहे.