कुत्र्याने चावा घेतल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l कुत्र्याने चावा घेतल्याने एक तरुण गंभीर अवस्थेत होता. परंतु सदर तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भुसावळ येथून जवळच असलेल्या फुलगाव या गावी घडली.
भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे २२ ऑगस्ट रोजी एका मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने दोघांना चावा घेतला. याच दिवशी फुलगाव उड्डाण पुलालगत कुत्र्याने झोपलेल्या एका ६० वर्षीय इसमाच्या तोंडावर चावा घेतला होता या नंतर याच मोकाट कुत्र्यांनी फुलगाव येथील गणेश देवराम सोनवणे (वय ३०) या युवकाला चावा घेतला होता. हा युवक यात गंभीर जखमी झाला होता. यामुळे गणेश सोनवणे याला तातडीने जळगांवला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून तेथील एक दिवसाच्या उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला घरी जावून औषधोपचार घेण्याचा जाण्याचा सल्ला दिला.
मात्र, औषधोपचार घेत असताना जवळ जवळ १८ दिवसानंतर गणेश सोनवणेला सोमवारी रात्री अचानक जास्त प्रमाणात त्रास होऊ लागल्याने त्याला पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी उपचार सुरू असताना तारीख १० रोजी अखेर त्याचा मृत्यू झाला. यामुळे फुलगावसह परिसरात मोकाट श्वानांबाबत मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या पूर्वी मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांनी तीन इसमांसह गावातीलच एका बकरी व म्हशीला सुद्धा चावा घेतला होता. त्यात चावा घेतलेल्या बकरी व म्हशीचाही मृत्यू झाल्याचे सांगितले गेले .