यावल तालुक्यातील निंबादेवी धरणात जळगावचा तरुण बुडाला, एकाला वाचविण्यात यश
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातील निंबादेवी धरणात रविवार रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास अंघोळीसाठी गेलेल्या ८ तरुणांपैकी जळगाव शहरातील १८ वर्षीय तरुण खोल पाण्यात बुडून बेपत्ता झाला. दुसऱ्या एका तरुणाचा मात्र थोडक्यात बचावला.
रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी, गेंदालाल मिलमधील ८ तरुण सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी यावल तालुक्यातील सावखेडासिम जवळ असलेल्या निंबादेवी धरणावर गेले होते. तेथे अंघोळ करताना जतीन अतुल वारडे (वय १८) हा खोल पाण्यात गेल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. त्याच्या सोबत आणखी एक तरुण देखील बुडू लागला होता. मात्र, इतर तरुणांनी त्याला तत्काळ मानवी साखळी तयार करून त्याच्या केसांना धरून बाहेर ओढून त्याचा जीव वाचविला.
घडलेल्या सदरच्या घटनेची माहिती पोलिस पाटील पंकज बडगुजर यांनी यावल पोलिसांना दिल्यानंतर सहायक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार अर्षद गवळी, मुकेश पाटील, अमित तडवी आणि संतोष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र अंधार पडत असल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. पुन्हा आज सोमवारी सकाळ पासून शोध सुरू करण्यात आली आहे. यावल पोलीस स्टेशनला या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस घटनास्थळी तरुणाचा शोध घेत आहे.
पावसाळ्यात यावल तालुक्यातील सातपुडा च्या पायथ्याशी असलेल्या निंबादेवी धरणावर दूरदूरहून मोठ्या संख्येने लोक सुटी घालविण्यासाठी अथवा फिरण्यासाठी येत असतात.
पावसाळा सुरु असल्याने या धरण परिसरात पाण्याची पातळी कधीही वाढू शकते. अपघाताचा धोका लक्षात घेता नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा यावलचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिला आहे.

