पेट्रोल पंप अपहार प्रकरणातील फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पोलिस दलाच्या पोलिस वेल्फेअर समितीच्या दक्षता पेट्रोल पंपावरील इंधन विक्रीतून आलेल्या १.३३ कोटी रुपयांचा अपहार करणारा पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण आला. वाघ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याच्या मुलाच्या बँक खात्याचाही सहभाग समोर आल्याने वाघ यांचेसह त्याच्या मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
जळगाव येथील पोलिस दलाच्या दक्षता पेट्रोल पंपाच्या दैनंदिन व्यवहारांची व्यवस्थापक जबाबदारी पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक वाघ याच्याकडे होती. त्यांनी १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार केल्याबाबत त्यांचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वाघ हे फरार असल्याने त्याच्या शोधार्थ पथके रवाना केली होती.
वाघ हे ९ मार्च रोजी स्वतः स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. त्यांची पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, तपासाधिकारी राहुल गायकवाड यांनी चौकशी केली.
चौकशीत वाघ केवळ १० ते १५ लाखांचा अपहार केल्याचे सांगत आहे. मात्र वाल्मीक वाघ यांच्या बँक खात्याची चौकशी केली असता त्यात अपहार काळात मोठ्या प्रमाणात रक्कम ट्रान्सफर झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. वाघ यांचा मुलगा शेखर वाघ याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याच्या संशयावरून शेखर वाघला सुद्धा अटक करण्यात आली आहे.


