शौचालयाच्या कामात लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शौचालयाचे कामाचा अहवाल फिर्यादीच्या बाजूने तयार करून गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठवण्यासाठी तक्रारदाराकडे पंचवीस हजाराची लाच घेतांना चांदवड तालुक्यातील दहेगाव (म) येथील ग्रामसेवकास एसीबीकडून लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याला तक्रार दाराकडून घरकुल कामाच्या अंतर्गत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
याबाबत सविस्तर असे, लाचलुच प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित चंद्रकांत तुकाराम पाटील हा चांदवड तालुक्यातील दरेगाव (म) या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक म्हणून काम पाहतो. तक्रारदार यास शासन निर्णयानुसार इंदिरा आवास घरकुल योजनेखाली शौचालयाचे बांधकाम करावयाचे होते. दरम्यान या शौचालयाच्या कामाचा अहवाल तयार करून तो गटविकास अधिकाऱ्याकडे पाठवण्यासाठी ग्रामसेवक पाटील याने सुरवातीला २७,७५० रुपयांची लाच मागितली. मात्र तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले.
तसेच सदर तक्रारदाराच्या माहितीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामसेवकास लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याप्रकरणी चांदवड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित पाटील यास अटक करण्यात आली आहे.