मोठी दुर्घटना : भुसावळ मध्ये दुमजली इमारत कोसळली
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l रविवार दिनांक २५ रोजी भुसावळ शहरातील भुसावळ – यावल रोड लगत असलेल्या साई चंद्रनगर येथील दुमजली रो हाऊस बिल्डिंग दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. ही घरे कोसळण्याआधी तडे पडल्याचे लक्षात आल्याने घरातील रहिवाशी लागलीच घराबाहेर मैदानावर आल्याने सुदैवाने कोणासही इजा झाली नाही.
भुसावळ शहरातील सातारे शिवारतील एकमेकांना लागून असलेल्या या तिन्ही इमारतींचा सततच्या पावसामुळे जमिनीचा भराव वाहून गेल्याने या नवीन घरांची पडझड झाल्याचा प्रथम निष्कर्ष काढला गेला असून प्रत्येकी घराचे अंदाजे १८ ते २० लाखांचे नुकसान झाले असून त्याच बरोबर त्यांचे घरातील मौल्यवान वस्तूंचे सुमारे ५ ते ६ लाखांचे प्रत्येकी नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे या वसाहतीतील कंपाउंड वॉललासुद्धा मोठे तडे गेलेले असून संभाव्य धोका पाहता येथील धोकाग्रस्त इमारतीमधील नागरिकांना येथून घर खाली करण्याचे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे.
चंद्रकला रमेश दांडेकर व मनोज रमेश दांडेकर तसेच विद्या चंद्रकांत चौधरी व विराज चंद्रकांत चौधरी यांचे घर घरातील वस्तूंचेही नुकसान झाले असून रुख्मिणी प्रवीण नरवाडे यांनी खरेदी केलेले घराचाही समावेश आहे.
कोसळलेल्या घराच्या दक्षिण बाजूस असलेल्या सात रहिवाशांना इतर ठिकाणी राहण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. तसेच पूर्व बाजूस असलेल्या पदमालय अपार्टमेंटमध्ये २४ फ्लॅट्स पैकी १७ फ्लॅट्समध्ये रहिवासी आहेत. इतर ५ रिकामे आहेत. या अपार्टमेंटच्या उत्तर बाजूस असलेल्या भिंतीस तडे पडून इमारत पडण्याची शक्यता असल्याने येथील रहिवाशांना पालिकेकडून लोणारी मंगल कार्यालयात राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या वेळी पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे, उपमुख्याधिकारी लोकेश ढाके, आपत्ती व्यवस्थान व बचाव पथक अग्निशमन दलाचे कर्मचारी, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी यांची उपस्थिती होती.