तेलंगणा मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जळगाव मध्ये अटक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील चंदानगर पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेल्या अझहर निजाम खाटीक (रा. जळगाव) या फरार आरोपीला जळगाव पोलिसांनी अटक केली.
अझहर निजाम खाटीक (रा. जळगाव) या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधात चंदानगर पोलीस स्टेशनचे पथक जळगाव जिल्ह्यात दाखल झाले होते. या पथकाने जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना गुन्ह्याची माहिती दिली आणि आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीची विनंती केली
पोलीस अधिक्षक डॉ. रेड्डी यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना या पथकाला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्थागुशा जळगावचे सहाय्यक पोलीस फौजदार विजयसिंग पाटील आणि पोलीस हवालदार अक्रम शेख यांचे एक विशेष पथक तयार करून त्यांना आरोपीला शोधून ताब्यात घेण्याच्या सूचना व मार्गदर्शन केले.
आरोपी अझहर निजाम खाटीक हा मेहरुण परिसरात लपल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून पाठलाग करून अझहरला शिताफीने अटक केली. आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी अझरला चंदानगर पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्तालय सायबराबाद (तेलंगणा) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. **