डोक्यात दगड घालून आचार्याची हत्या; सीसीटीव्ही फुटेजआधारे हल्लेखोर जाळ्यात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा : भांडीबाजार परिसरात गुरुवारी मध्यरात्री २ वाजेदरम्यान मध्यवर्ती ठिकाण असलेल्या हॉटेलमध्ये काम करणार्या आचार्याची डोक्यात दगड घालून एकाने हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक केली. अनिल गायधनी (वय ५०) असे खून झालेल्या आचार्याचे नाव आहे. शुभम महेश मोरे (२२, रा. सराफ बाजार, नाशिक)असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, भांडाबाजार येथील बालाजी कोट परिसरात गुरुवारी मध्यरात्री सरकारवाडा पोलीस ठाण्याचे गस्ती पथक गस्ती घालत होते. पोलीस बालाजी कोट मंदिर परिसरातून जात असताना रक्तबंबाळ मृतावस्थेत त्यांना एक अनोळखी पुरुष दिसून आला. सहायक उपनिरीक्षक राजेंद्र कदम यांनी तत्काळ घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.
त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत सहायक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पंचवटीचे डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह गुन्हे शाखांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सरकारवाडा, पंचवटी, भद्रकाली पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांनी तत्काळ हल्ल्यामागील संशयितांचा शोध सुरु केला. पोलीस तपासात भांडीबाजारातील हॉटेल राजहंसमधील कामगाराचा मृतदेह असल्याची माहिती समोर आली. हॉटेलमालक रमेश निकम यांनी घटनास्थळी येत मृतदेह आचारी अनिल गायधनी याचा असल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान, पोलिसांनी हत्येच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिलाले. त्याआधारे पोलिसांनी दोन तासांत पोलिसांनी आरोपी शुभम मोरे यास अटक केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.