“मंडे टु मंडे न्युज” च्या बातमीची दाखल, प्रशासनाला आली जाग, MIDC पाईपलाईन वरील गळती बंद, हजारो लिटर पाण्याची बचत
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | नशिराबाद येथील छोट्या बोगद्याजवळ, पोलिस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या MIDC ला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवरील व्हॉल्वमधून होत असलेल्या पाणी गळती बाबत “मंडे टू मंडे न्युज” मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेत तांत्रिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन व्हॉल्वची दुरुस्ती करत पाणी गळती पूर्णपणे बंद केली आहे.
या गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात होते. परिसरातील काही नागरिक त्या ठिकाणी पाणी भरत असले तरी मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याने पाण्याची नासाडी होत होती. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बाब गंभीर मानली जात होती.
“मंडे टू मंडे” मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित व्हॉल्वची दुरुस्ती केली. त्यामुळे आता पाणीगळती थांबली असून दररोज वाया जाणाऱ्या हजारो लिटर पाण्याला आळा बसला आहे.
प्रशासनाने केलेल्या तातडीच्या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, या प्रकरणात प्रसिद्ध झालेली बातमी खऱ्या अर्थाने “मंडे टू मंडे इफेक्ट” ठरल्याची चर्चा परिसरात होत आहे.


