बायोडिझेल तस्करीचा मास्टरमाइंड शिवसेनेचा शहरप्रमुख : फरार शहरप्रमुखाचा चौफेर शोध सुरू !
अहमदनगर, प्रतिनिधी : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या बायोडिझेल तस्करीत शिवसेनेचा शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक दिलीप सातपुते याचे नाव समोर आले असून तोच या तस्करीचा मास्टरमाइंड असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
बायोडिझेल तस्करीचे नगरचे प्रकरण राज्यभर गाजल्यानंतर अखेर कोतवाली पोलिसांना या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करावा लागला. गुन्ह्यात कोतवाली पोलिसांनी सातपुते याचा आरोपी म्हणून समावेश केला असून त्याचा चौफेर शोध सुरू केला आहे. पोलीस तपासाची कुणकुण लागतात सातपुते नगर शहरातून पसार झाला. सातपुते याचे नाव समोर आल्याने या गुन्ह्यात सहभाग असलेल्या अनेकांचे धाबे दणाणले असून त्यांनीही शहर सोडल्याची चर्चा आहे.
22 ऑक्टोबर रोजी पहाटे पुरवठा विभाग व कोतवली पोलिसांनी केडगाव बायपास चौकात छापा टाकून बायोडिझेलवर कारवाई केली होती. यावेळी एकूण 52 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली आहे. बायोडिझेल तस्करीत राजकीय नेत्याचा हात असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून नगरमध्ये चर्चा होती. पोलिस मात्र कासव गतीने या गुन्ह्याचा तपास करत होते. या तस्करीत सातपुते याच्यासह आणखी कोणाचे नावे समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंधरा दिवसापूर्वी नगर-सोलापूर रोडवर छापा टाकून बायोडिझेल तस्करीचा पर्दाफाश केला होता. तेथील तस्करीत मोठमोठ्या लोकांचा हात असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडील माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढली आहे.