क्राईमराष्ट्रीय

Serial Blast Case: साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात ३८ दोषींना फाशीची शिक्षा

अहमदाबाद, मंडे टू मंडे वृत्तसेवा : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. २६ जुलै २००८ मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोस्टाच्या प्रकरणात तब्बल ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणात एकूण ४९ दोषी होते. त्यापैकी ३८ जणांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर इतर ११ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात फाशीची शिक्षा सुनावल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. या स्फोटात ५८ जणांचा मृत्यू झाला होता.

तसेच दोषींच्या शिक्षेवरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. सरकारी वकिलांनी सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली असताना दुसरीकडे आरोपींच्या वकिलांकडून कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. तर न्यायाधीश ए आर पटेल यांनी ८ फेब्रुवारीला सर्व निर्णय देताना सर्व ४९ आरोपींना दोषी ठरवले होते. कोर्टाने ७७ पैकी २८ आरोपींची सुटका केली होती. त्यामुळे या ४९ आरोपींना काय शिक्षा दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार कोर्टाने आज निर्णय दिला असून ३८ जणांना फाशी तर ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान याआधी २ फेब्रुवारीला याप्रकरणी निकाल येणार होता. परंतु न्यायमूर्ती ए आर पटेल यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ८ फेब्रुवारीपर्यंत तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर ८ फेब्रुवारीला सर्वांना दोषी ठरवण्यात आले.

नेमके काय घडले होते ?

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटाची घटना 26 जुलै 2008 रोजी घडली होती. यादिवशी अहमदाबाद नगर पालिका क्षेत्रातील तब्बल 21 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. हे सर्व बॉम्बस्फोट केवळ एका तासात घडले होते. या स्फोटाने संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यात 56 निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्ये 20 तर सुरतमध्ये 15 गुन्हे दाखल केले होते. संबंधित गुन्ह्यातील सर्व आरोपी एकाच कटाचा भाग असल्याने सर्व गुन्हे मर्ज करून एकत्रित खटला भरवण्यात आला होता.यानंतर 28 जुलै रोजी गुजरात पोलिसांची एक विशेष टीम तयार करण्यात आली होती. या पोलीस पथकाने अवघ्या 19 दिवसांत 30 दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर उर्वरित दहशतवाद्यांना वेळोवेळी अटक करण्यात आली. अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटांपूर्वी इंडियन मुजाहिदीनच्या याच दहशतवाद्यांनी जयपूर आणि वाराणसीमध्ये देखील बॉम्बस्फोट घडवून आणला होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!