आता प्रतिक्षा १० वी च्या निकालाची, कधी लागणार निकाल? शिक्षण मंत्री केसरकरांनी दिली मोठी अपडेट
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर करण्यात आला. आता १० वी च्या निकालाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत माहिती दिली. दहावीचा निकाल देखील २७ मे पर्यंत लागेल, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
दहावीचा निकाल २७ मे पर्यंत लागेल, अशी माहिती केसरकर यांनी दिली. अकरावीची प्रवेश प्रक्रिया २४ तारखेपासून सुरु होत आहे. राज्यातील पाच शहरांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होत असते तर इतर शहरांमध्ये ऑफलाईन प्रवेशप्रक्रिया होते, असं दीपक केसरकर म्हणाले. बारावीचा निकाल यावेळी आठ दिवस अगोद जाहीर झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच निकाल जाहीर होणार होता.मात्र, राज्यात पाचव्या टप्प्याचं मतदानं होणं बाकी होतं. त्यामुळं राज्यातील मतदान पार पडल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला असं दीपक केसरकर म्हणाले. ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसायचं असल्यास ते बसू शकतात, असं देखील दीपक केसरकर म्हणाले.
१६ जुलैच्या दरम्यान पुन्हा परीक्षा होणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणि श्रेणी सुधारण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी आहे. ऑगस्टमध्ये निकाल जाहीर होईल, असं केसरकर म्हणाले.