ऐनपूर महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपूर,ता.रावेर,प्रतिनिधी। येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने हे होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून प्रा. नरेंद्र मुळे, स. व. प. महाविद्यालय, ऐनपूर हे उपस्थित होते. जस जसा समाज प्रगत होत जातो तस तसा त्या समाजाच्या नैतिकेला धरून ठेवण्यासाठी एखाद्या महान पुरुषाच्या विचारांची गरज भासते आणि महापुरुषांच्या विचारांनी नेहमी समाजाला योग्य वळण दिलेले आहे. अशी गांधी विचारसरणी ही महात्मा गांधीनी आपल्या देशाला व जगाला दिलेली सर्वात मोठीदेण आहे. काळ बदलत असतांना सुध्दा गांधी विचारांचे महत्व आजही तेवढच आहे याचा आपण विचार केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. महात्मा गांधीजी यांच्या पुण्यातीथीलाच हुतात्मा दिन साजरा केला जातो. महात्मा गांधींनी जगाला शांती, सत्य, अहिंसा व प्रेमाचा संदेश दिला. त्यांना रविंद्रनाथ टागोर यांनी महात्मा ही पदवी दिली. महात्मा म्हणजे महान आत्मा असेही ते म्हणाले. मा. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी अध्यक्षीय समारोप करतांना सांगितले की, गांधीजींच्या जीवनाकडे बघितल्यावर असे लक्षात येते की, सामान्याकडून असामान्याकडे यशस्वी वाटचाल कशी करता यईल याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे महात्मा गांधी. सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता असे संबोधले. गांधीजींच्या विचारांची प्रेरणा अनेक लोकांनी घेतली. गांधीजींचा जन्म देणारा देश म्हणून आपल्या देशाची ओळख असली तरी गांधीजीचा खून करणारा देश म्हणूनही आपल्या देशाची ओळख आहे. गांधी विचार एक दोन दिवसाचे वाचन करून समजणार नाही तर गांधीजींच्या चरित्राच पारायण केल्या शिवाय आपल्याला गांधी विचार कळणार नाहीत असेही ते म्हणाले. शेवटी स्वातंत्र लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी लढा दिला असेल, बलिदान दिल असेल अश्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जे. पी. नेहेते यांनी तर आभार प्रा डॉ. एस. एस. साळुंके यांनी मानले. सदर कार्यक्रमाला एकूण ८५ स्वयंसेवक, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी नोंदणी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. जे. पी. नेहेते, प्रा. डॉ. एस. एस. साळुंके, प्रा. डॉ. डी. बी. पाटील, डॉ. रेखा पाटील व प्रा. डॉ. एस. एन. वैष्णव यांनी परिश्रम घेतले.