ऐनपुर-निंबोल परीसरात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान.
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपुर,ता.रावेर,विजय के अवसरमल। हवामान खात्या कडून तीन ते चार दिवसांपासुन अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.त्या नुसार ऐनपुर परिसरातील निंबोल, विटवा, सुलवाडी , कोळदा ,धामोडी , कांडवेल , वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे या गावातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
साधारणतः काल दि. ७ मार्च रोजी रात्री ११ च्या सुमारास ऐनपूरसह परिसरातील गावांमध्ये जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे हरभरा , गहू , मका इत्यादी पिकांचे नुकसान झाले. जोरदार वाऱ्यामुळे परिपक्व झालेल्या गहू , हरभरा व मका या पिकांचे नुकसान झाले. ऐनपूर परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या पिकांची लागवड केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला असून शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे. या अवकाळी पावसामुळे इतरही रब्बी पिके वाया गेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी गव्हाची व हरभऱ्याची पेरणी केली आहे ती पिके आडवी पडली आहेत. खरीप पिकांची कसर रब्बी पिकांमध्ये निघेल या आशेवर शेतकरी होता. पण या अवकाळी पावसाच्या आगमनामुळे केळी, गहू , हरभरा , मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. म्हणून या नुकसानांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यायला हवी. अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे शासन या नुकसानग्रस्तांना मदत करेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.