आला मान्सून : पुढचे काही तास राज्यासाठी धोक्याचे,या भागात पडणार वीजांच्या गडगडाटासह पाऊस!
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l हवामान विभागाने दक्षिण-पश्चिम मान्सून ६ जून म्हणजेच आज महाराष्ट्रात पोहोचल्याचं सांगितलं. राज्यात तळकोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ भागात सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे. मान्सून महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पुढचे काही तास धोक्याचे असल्याचा इशारा आयएमडीने दिला आहे.
आयएमडीने असंही सांगितलं आहे की, राज्यातल्या पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, सांगली, सोलापूर, नांदेड आणि मुंबईच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. या भागात वारे ३०-४० किमी प्रतीतासाने वाहतील,
हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, मेडक, भद्राचलम, विजयनगरम आणि नंतर बंगालच्या खाडीमार्गे इस्लामपूरपर्यंत आला आहे. मान्सून ७-८;जूनपर्यंत मुंबईत प्रवेश करेल आणि १० जूनपर्यंत राज्यभरात पसरेल, असा अंदाज आहे.
महाराष्ट्रात यंदा तापमानाने उच्चांक गाठला होता. कोकण, मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही तापमान ४० ते ४५ डिग्रीपर्यंत होतं. तसंच अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये बुधवारी संध्याकाळी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली,