विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेसह मैदानी खेळही आवश्यक – मा. आ. रावसाहेब शेखावत
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l संत मुक्ताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला. यावेळी सत्कार समारंभाचे अध्यक्ष म्हणून विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावतीचे अध्यक्ष तथा अमरावतीचे माजी आमदार रावसाहेब शेखावत हे उपस्थित होते. “मुक्ताईनगर तालुक्याने भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती आणि माझ्या मातोश्री महामहीम प्रतिभाताई पाटील यांना भरभरून प्रेम दिले असून या मुक्ताईनगर तालुक्याप्रति आणि या तालुक्याच्या शैक्षणिक विकासाचे माझे दायित्व म्हणून येथील महाविद्यालयात नविन तंत्रज्ञान व संपूर्ण अद्ययावत सोयी सुविधा ग्रामीण भागातील कष्टकरी पालकांच्या मुलांना आणि आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे, हे मी माझे कर्तव्य समजतो.” असे मत रावसाहेब शेखावत यांनी याप्रसंगी मांडले. “कामगार- शेतकरी वर्गातून पुढे आलेला माझ्या महाविद्यालयाचा विद्यार्थी बोर्ड परीक्षेत जेव्हा उच्च श्रेणी घेऊन उत्तीर्ण होतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण धन्य झाल्याची” भावना व्यक्त केली.
“संत मुक्ताबाई महाविद्यालयामध्ये उच्च प्रतीच्या क्रीडा सुविधा तसेच जिम्नेशियम, महाविद्यालयाचे ग्रंथालय, विद्यार्थ्यांना इंटर ऍक्टिव्ह लर्निंगसाठी स्मार्ट बोर्ड तसेच सर्वोत्तम अशा शैक्षणिक सुविधा पुरविण्यामध्ये विद्याभारती शैक्षणिक मंडळ नेहमीच अग्रेसर राहील”, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. महाविद्यालयाच्या माध्यमातून गेल्या वर्षी 45 विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये प्लेसमेंट सेल च्या माध्यमातुन नोकरीस लागल्यामुळे त्यांनी प्लेसमेंट सेल चे कौतुक केले. संत मुक्ताबाई कनिष्ठ महाविद्यालय आणि माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश व खाण्याजोगे आहे असे म्हणून त्यांनी याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे नाव लौकिक करण्यामध्ये त्यातील शिक्षक आणि प्रशासकीय व्यवस्था मजबूत असावी लागते, त्याकरिता संस्थेने नियुक्त केलेले कर्मचारी हे अतिशय मेहनती आणि कार्यतत्पर आहेत, येथील प्राचार्य, मुख्याध्यापक यांचा मला अभिमान आहे, असे मत या ठिकाणी त्यांनी मांडले.
सत्कार समारंभ प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आय डी पाटील हे आपल्या मनोगत पर भाषणात म्हणाले की, “आपल्या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या सर्व शैक्षणिक सुविधांमुळे आणि अध्यक्षांच्या मार्गदर्शनामुळे महाविद्यालयाचा भरभक्कम विकास होत आहे. मुक्ताईनगर तालुक्यात प्रथमच महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून अतिशय होतकरू विद्यार्थी आपला सर्वांगीण विकास करून घेत आहे.” या संपूर्ण विकास कार्यक्रमात संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष रावसाहेब दादा शेखावत यांचे त्यांनी मनापासून आभार मानले.
सत्कार समारंभ प्रसंगी संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एन डी काटे यांनी शाळेच्या गुणवत्तेचा आलेख वाचून दाखवला. मुक्ताईनगर तालुक्यात शाळेचा शंभर टक्के निकाल जाहीर झाल्यामुळे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाला क्रीडा समन्वयक प्रा. डॉ.जे.बी. सिसोदिया, स्थानिक व्यवस्थापन समितीचे भरत आप्पा पाटील व महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. आर. एन. शेवाळे यांनी केले.