अँड रविंद्र भैया पाटील यांचा जिल्हा बँक संचालक पदाचा राजीनामा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा बँकेचे ज्येष्ठ संचालक रवींद्रभैय्या पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. बँकेची निवडणूक तोंडावर आली असतांनाच पाटील यांनी राजीनामा दिल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली. दरम्यान, त्यांनी नाराजीतून राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, ईडीने संत मुक्ताई साखर कारखान्यासाठी दिलेल्या कर्जाबाबत जिल्हा बँकेला नोटीस बजावल्याने उडालेली खळबळ शांत होत नाही तोच रवींद्रभैय्या पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते बँकेचे ज्येष्ठ संचालक असून त्यांनी बँकेच्या चेअरमनपदाची धुरा देखील सांभाळलेली आहे. त्यांचे वडील भाऊसाहेब प्रल्हादराव पाटील हे देखील प्रदीर्घ काळ संचालक व नंतर चेअरमन होते. अर्थात, जिल्हा बँकेच्या इतिहासातील काही दशके पाटील घराण्यातील संचालक कार्यरत आहेत. या पार्श्वभूमिवर, रवींद्रभैय्या पाटील यांनी ऐन निवडणुकीआधी राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.
ईडीची जिल्हा बँकेला नोटीस आल्याने खळबळ उडालेली असून येत्या काही दिवसात बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. असे असतांना रवींद्र पाटील यांनी त्यांच्या संस्थेला जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाबाबत वन टाईम सेटलमेंट होण्यातील अडचणींमुळे राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथराव खडसे यांच्यामुळे ही सेटलमेंट होऊ न शकल्याचा आरोप पाटील यांनी आधी देखील केला आहे. यातच त्यांनी आता थेट राजीनाम्याचा निर्णय घेतल्याने जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.